24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडउस्माननगर येथे बसवेश्वरांचे बॅनर फाडले

उस्माननगर येथे बसवेश्वरांचे बॅनर फाडले

एकमत ऑनलाईन

मारतळा/कंधार : उस्माननगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नियोजीत जागेवर लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडून विटंबना केल्याची घटना दि. १७ मेच्या मध्यरात्री घडल्ली. सकाळी या घटनेचा निषेध करित संतप्त ग्रामस्थांनी उस्माननगर ते नांदेड महामार्गावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

जिल्ह्यात मोठ्या उत्साहात जगत्गुरू महात्मा बसवेश्वर यांची जयंती शांततेत साजरी केली जात आहे. जयंती दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडले नाहीत. मात्र लोहा तालुक्यातील उस्माननगर येथे महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त पुतळयाच्या नियोजीत जागेवर लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडून विटंंबनेच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांत दोनवेळा महात्मा बसवेश्वरांच्या बॅनरची विटंबना करण्यात आली. दि. ८ मे रोजी अज्ञातांनी महात्मा बसवेश्वर यांच्या बॅनरची विटंबना केली होती.

तर दि. १७ मेच्या रात्रीही समाजकंटकांनी बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेवर लावलेले बॅनर फाडले. आठवडाभरातच दुसरी घटना घडल्याने बसवप्रेमी आणि ग्रामस्थामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही घटनामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर घटनेचा निषेध करत गावातील संतप्त ग्रामस्थांनी नांदेड ते उस्माननगर रस्त्यावर सकाळी १० वाजेच्या दरम्यान टायर जाळून रास्तोरोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली.

यावेळी उस्माननगर रस्त्यावर वाहतुक कोंडी होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस फौजफाट्यासह अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चित चांडक, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार मुंढे, कंधार विभागाचे थोरात, पो.नि. चिखलीकर, ग्रामीणचे पो.नि.अशोक घोरबांड यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली.

आरोपीला लवकरच पकडण्यात येईल, सर्वांनी शांतता राखावी, प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती मोरे यांनी केली. यानंतर ग्रामस्थ शांत झाले. सध्या गावात तणावपुर्ण शांतता असून गावात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या