कंधार : हबीब सय्यद
काही मोजक्याच राज्यातील सुस्थित असलेल्या किल्ल्यांच्या यादीत समावेश असलेल्या कंधार येथील भुईकोट किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्याला मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचा विळखा पडून सुद्धा त्याकडे पुरातत्व विभाग लक्ष देत नसल्याने पर्यटकांचा भ्रमनिरास होतो आहे. पुरातत्व विभागाचे किल्ल्याकडे असेच दुर्लक्ष होत राहिले तर हा ऐतिहासिक किल्ला लवकरच शेवटची घटिका मोजेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रकुटांच्या काळात कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जाणारा कंधारचा भुईकोट किल्ल्यात केलेले अनेक बांधकामे व बदल आजही आपल्याला पाहता येतात. किल्ल्यात अनेक वास्तू, अवशेष, सुंदर अशी भिंतीवर कोरलेली शिल्प, मंदिरे, लाल महल, शीत महल, अंबरखाना, दरबार महल, माचाली दरवाजा, राणी महल, कसबत महल, विहिरी, तोफा, बुरुजे असून त्यांच्या बांधकाम शैलीत विविधता आहे. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून किल्ला आणि आजुबाजुचा परिसर पाहण्यासाठी पूर्ण दिवस लागतो. पण आज घडीला पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कंधार हे पूर्वी राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे शहर होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधारमध्ये हजार नऊशे वर्षांपूर्वी हा किल्ला बांधला. कंधारला वैभव प्राप्त करून देणा-या या किल्ल्याच्या सुशोभीकरणावर गेल्या १२ ते १३ वर्षात १५ कोटीच्या जवळपास रुपये खर्च करण्यात आले. परंतू त्याचा किती उपयोग झाला, हा संशोधनाचा विषय आहे. आज या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. २४ एकरात विस्तारलेल्या या किल्ल्याला पूर्णपणे काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. या झुडपांमुळे किल्ल्याच्या भग्नावस्थेत वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात किल्ल्याला टाळे लावण्यात आले होते. दि. १६ नोव्हेंबर पासून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची ये जा सुरू झाली आसताना आणि पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत असताना पुन्हा किल्ला बंद करण्यात आल्याने सर्व काही चालू असूनसुद्धा किल्ला अजूनही का बंद आहे असा सवाल पर्यटकातून केला जात आहे.
किल्ल्याच्या आतून आणि बाहेरून काटेरी वनस्पती,
गवत, झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत झुडपांमुळे किल्ल्यात सापांचा संचारही वाढला असून यामुळे एखादेवेळी पर्यटकासह किल्लेदाराच्या जीवावरही बेतू शकते. किल्ला आजघडीला पूर्ण काटेरी झाडे, झुडपानी झाकून गेला आहे. कधी बंद तर कधी चालू यामुळे पर्यटकांची मोठी पंचाईत होत आहे. किल्ला पाहण्यासाठी दररोज वेगवेगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून पर्यटक येत असतात. या ठिकाणी आल्यावर त्यांना किल्ला बंद असल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे.
नियोजनशून्य कारभारामुळे किल्ल्याबाहेर किल्ला बंद असल्याचे सूचनाकिंवा वेळापत्रक नाही. एकाच कर्मर्चायावर किल्ल्याचा कारभार चालू आहे. किल्ल्याला निधी येऊनही स्थानिक लोक प्रतिनिधीकडून किल्ल्याचं पूर्ण डागडुगीजीचे काम झाले नाही. अक्षरशा काटेरी वनस्पती व झाडांनी किल्ल्यामध्ये व किल्ल्याभोवती ठाण मांडून बसल्या आहेत. किल्ल्याच्या प्रवेश दारापासून ते शेवटपर्यंत काटेरी वनस्पतीने किल्याच्या भिंती व परिसर खचाखच भरून गेला आहे. काही वेळेस सेवाभावी संस्था व शिवछत्रपती परिवारातर्फे या किल्ल्याचीसाफसफाई करण्यात आली होती. या किल्ल्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. ज्या पुरातत्त्व विभागाकडे किल्याचा ताबा आहे त्या विभागाचेही लक्ष नाही. काही तरुण मुले रोज किल्लाचढून मध्ये जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही अनुचित प्रकार घडला तर कोणाला जबाबदार धरावे असे नागरिकांतून बोलले जात आहे पुरातत्व विभागाकडे किल्ल्याच्या देखरेखची जबाबदारी आहे. परंतू हा विभाग उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहे. किल्ल्याची दुरवस्था होऊनही संबंधीत अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. त्यांना ना किल्ल्याचीचिंता आहे ना पर्यटकांची संपूर्ण किल्ला आतून आणि बाहेरून काटेरी झुडपाने झाकून गेला आहे. पुरातत्व विभागाची उदासीनता पर्यटकांच्या मुळावर येत असून किल्ल्यासाठीही ते मारक ठरत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पूर्वी कंधार ते लोहामार्गावर किल्ला किती अंतरावर आहे याचे नाम फलक लावण्यात आले होते तेही दिसेनासे झाले आहेत.