नांदेड : सध्या अस्तित्वात असलेला बियाणे कायदा तकलादू असल्यानेच बोगस बियाणे तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे बोगस बियाणे तयार करून विक्री करणा-यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशा स्वरुपाचा कायदा करावा अशी मागणी शेतकरी शेतमजूर सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी केली. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ कृषिमंत्री दादाजी भुसे यांना भेटून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काल (दि.२८) अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे बोगस सोयाबिन बियाणे तयार करून विक्रीचा प्रकार उघडकीस आला. कृषी विभाग व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कार्यवाही केलेल्या गोदामाला आज शेतकरी शेतमजूर सेनेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी पोलिस व कृषी विभागाच्या अधिका-यांशी इंगोले यांनी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले, सध्याचा बियाणे कायदा अत्यंत तकलादू असल्याने बोगस बियाणे तयार करून शेतक-यांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. बोगस बियाणे, खते पुरवठा करणा-यांमुळे शेतकरी आत्महत्याही वाढत आहेत.
भविष्यात बोगस खते- बियाणे देऊन कुणीही शेतक-यांची फसवणूक करणार नाही यासाठी कायद्यात बदल करून जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद गरजेची आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी कल्याणकर अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कपाटे, लक्ष्मीकांत मुळे, रुखमाजी इंगोले, गजानन मेटकर, गुणवंत विरकर उपस्थित होते.
गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागाला कळवा
सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाणे, अवधूत कदम यांनी हा बियाणांचा काळाबाजार उघडकीस आणला होता. दरम्यान, बोगस बियाणांचे प्रकार लक्षात आल्यास संबंधितांनी तत्काळ कृषी विभाग, पोलिस ठाणे यांना कळवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.