नांदेड : मागील काही दिवसापासुन देगलुर व परिसरात रात्रीचे वेळी घरफोडीचे सत्र चालू होते. महिन्याभरात चोरट्यांनी शहरात पाच घरफोड्या करत लाखोचा मुद्देमाल लंपास केला होता़ या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते़ दरम्यान पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील एका आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील १ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ आरोपीस न्यायलयाने २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़
त्यानंतर चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सोहन माछरे यांनी सपोनि माळाळे, पो.उप.नि. श्रीकांत मोरे, पो.उप.नि. पुनम सुर्यवंशी, पो.ना. कृष्णा तलवारे, पो.कॉ. सुधाकर मलदोडे, पो. कॉ. संजय यमलवाड, पो.कॉ. नामदेव मोरे, पोहेकॉ. शेख जावेद, पो.कॉ. महाजन, पो.कॉ. बेग यांचे पथक तयार करुन तसेच रात्रगस्त कामी असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोपी निष्पन्न करण्याचे दृष्टीने सुचना दिल्या.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांना राजु बसवे रा. मुकुंदनगर हा शहरात नवीन राहण्यास आला असून त्याचेघरी चोरीचे साहीत्य असल्याची माहीती समजली. त्यावरून पोलिसांनी राजु गंगाराम बसवे (वय ३९, रा. मुकुंदनगर, देगलुर) या आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीच्या घराची घरझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात टिव्ही, सोन्याचे दागीने, मोबाईल, यासह इतर चोरीच्या गुन्ह्यातील साहित्य असा एकुण १ लाख ५ हजार ५०० रुपयाचा माल मिळुन आला.
सदर आरोपीकडुन नमुद गुन्ह्यासह इतर पोलीस ठाणे हृदितील चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असून, त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ जानेवारी पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो. नि. सोहन माछरे हे करीत आहेत.