नांदेड : जिल्हा व शहर परिसरात घरफोडी, लुटमार, चैनस्रॅंिचगचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री सुर्यानगर भागातून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत जवळपास अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात मागील काही दिवसापासून सातत्याने घरफोडी सारख्या गंभीर घटना घडत आहेत. चोरट्यांनी टोळी घरांवर पाळत ठेवून नियोजनपुर्व तयारी करून चो-या करत आहेत. वारंवार घडणा-या चो-यांच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बुधवार दि.७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी सुर्यानगर भागात घरफोडी केली. सुर्यानगर भागात राहणारे दीलिप तुकाराम खंडागळे हे बाहेरगावी गेले होते. याची गुप्त माहिती चोरट्यांना लागली आणि चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर घरातील २ लाख ४२ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या दागीन्यासह इतर मुद्देमालावर चोरट्यांनी हातसाफ केला. दीलिप खंडागळे हे घरी परतल्यानंतर त्यांच्या ही घटना लक्षात आली. त्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोनि सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भिसे हे करीत आहेत.