देगलूर : देगलूर येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवराया गंगाराम मावंदे (वय ६५ वर्षे) यांना कोरोना झाला. त्यांना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ; परंतु दवाखान्यातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि आरोग्यविषयक साधनातील दोषामुळे त्यांचे हाल झाले एवढेच नव्हे तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मयतावर तब्बल ३७ तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरातील तोटावार गल्ली भागातील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक शिवराया गंगाराम मावंदे (वय ६५ वर्ष) यांना ताप येऊ लागल्यामुळे त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीत त्यांना टाइफाईड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. औषधोपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती बिघडू लागली.
कोरोनाची शंका आल्यामुळे ते येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले असता येथील कर्मचा-्यांने नावनोंदणी करून न घेता आता दवाखान्यात डॉक्टर नाहीत डॉक्टर आल्यानंतर या म्हणून घरी परत पाठविले. एवढेच नव्हे तर नाव नोंदणीनंतर दोन दिवसांनी नंबर आल्यावर तुमचा स्वॅब घेण्यात येईल असे सांगितले.देगलूर येथील दवाखान्यात व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याचे पाहून दिनांक २४ जुलै शुक्रवार रोजी ते नांदेडातील निर्मल हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. येथे दोन दिवस उपचार केल्यानंतर दिनांक २७ जुलै रोजी या रुग्णालयातील प्रशासनाने आमच्याकडे व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही, तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल व्हा. असे म्हणून काढून दिले.
दिनांक २७ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवराया मावंदे यांना शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डमिट करण्यात आले ; परंतु येथेही व्हेंटिलेटरचा तुटवडा होता. त्यांना व्हेंटिलेटर ऐवजी श्ववसनासाठी एक मशीन लावण्यात आली. रात्री आठ वाजल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि अकरा वाजण्याच्या सुमारास व्हेंटिलेटर अभावी त्यांची प्राणज्योत मालवली. तरीही लावलेली मशीन हार्टबीट दाखवत होती.
सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलाने डॉक्टरांना बोलावून वडील मृत झाल्याचे सांगितले ; परंतु डॉक्टरांनी रुग्ण जीवंत असल्याचे सांगितले. वेळानंतर डॉक्टरांनी ईसीजी मशीन आणून तपासणी केली आणि दिनांक २८ जुलै रोजी साडेदहाच्या सुमारास शिवराया गंगाराम मावंदे यांना मृत घोषित करून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. अंत्यसंस्कार करणा-्या कर्मचा-यांनी ढगाळ वातावरणाची अडचण पुढे करून अंत्यसंस्कार करता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे दिनांक २९ जुलै रोजी दुपारी तब्बल ३७ तासांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार केला.
Read More लॉकडाऊनची घोषणा होताच बाजारपेठेत गर्दी