18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडचारठाण्यात अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल

चारठाण्यात अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील विनायक खताळ यांनी चारठाणा येथील अवैध सावकारी करणा-या संदर्भात जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नुसार पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित व्यक्तीकडे सावकारी करण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी चारठाणा येथील सावकारा विरूध्द बुधवार, दि.२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणा-यांचे धाबे दणाणले आहे.

जिंतूर तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील विनायक केशव खताळ यांनी ७ सप्टेंबर २०१३ रोजी भावाच्या शिक्षणासाठी वैजनाथ मलकार्जून गजमल यांच्याकडून २ लाख रुपये ३ टक्के व्याज दराने घेतले होते. त्या मोबदल्यात खताळ यांच्या मालकीचे गट क्रमांक ४२३ मधील प्लॉट खरेदी खत पंचासमक्ष करून दिले होते. दरम्यान, २ लाखांसह व्याजाचे १ लाख ४४ हजार रुपये दिले. उर्वरित ५६ हजार रुपये खताळ देण्यास तयार असताना देखील गजमल यांनी त्यांच्या प्लॉटवर ताबा करून प्लॉट देण्यास नकार दिला. या संदर्भात खताळ यांनी परभणी पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांच्याकडे गजमल विरुद्ध १२ ऑगस्ट २०२१ रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे मंगेश सुरवसे यांच्या आदेशाने २ सप्टेंबर रोजी चारठाणा येथे २० कर्मचा-यांच्या दोन पथकानी गजमल यांच्या घर व दुकानाची झडती घेतली. यावेळी घर व दुकानातून २३ खरेदी खतासह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. सदर कागदपत्रे संबंधित अधिका-यांनी ताब्यात घेतली होती.

या पथकांमध्ये सहकार पथक प्रमुख टी.बी. राठोड, ए.जी. निकम, डी.एस.हराळ, एस.बी.लोणीकर, विजय देखणे, किरण नांदापूरकर, श्रीमती अल्का जवळेकर, मंडळ अधिकारी श्रीमती अटकोरे, तलाठी आर.एन. गायकवाड, भूमी अभिलेख कार्यालयाचे चव्हाण, केंद्रे, पोलीस नाईक विष्णूदास गरूड, शिवदास सूर्यवंशी, श्रीमती अस्मिता मोरे, जंगापल्लेवाड आदींचा सहभाग होता.

पथकातील अधिका-यांनी अवैध सावकारीच्या अनुषंगाने आक्षेपार्ह असलेली कागदपत्रे हस्तगत करून तब्बल २० दिवस या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीमध्ये चारठाणा येथील गजमल यांच्याकडे सावकारीचा परवाना नसताना देखील अवैधरित्या सावकारी करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी जिंतूर सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक महादेव यादव यांच्या फियार्दीवरून गजमल विरुध्द चारठाणा पोलीस ठाण्यात अवैध सावकारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या