अर्धापूर : अर्धापूर शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील वैशिष्टपुर्ण विषय योजनेच्या मंजूर झालेल्या रस्ता व नाली बांधकाम टेंडर तात्काळ रद्द करून मंजूर झालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीमधून शहरातील इतर भागात अत्यावश्यक विकास कामे करण्यासाठी मंजूरी द्यावी, अशी मागणी अर्धापूर नगरपंचायतीचे नगरसेवक शेख जाकेर यांनी मुंबईत जावून केली. याबाबत सविस्तर माहिती देवून राज्यपाल आणि संबंधित मंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
अर्धापूर नगरपंचायतीच्या खात्यावर वैशिष्ट पूर्ण अनुदाना अंतर्गत वार्ड क्र. ४ मध्ये ३ कोटी रुपये मंजूर झाला असून सदरील निधी हा सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांना देण्यात आला आहे. त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतर्गत रोड, नाली बांधण्याकरीता दृष्टी इंटरप्रायजेस शास्त्री नगर, नांदेड यांना टेंडर दिले. रितसर कारवाई पूर्ण करून दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला.
आदेशात कामाचे स्वरुप अर्धापूर नगरपंचायत कृष्णनगर (हट्टेकर निवास ते तामसा रोड) अंतर्गत सी. सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, पुंडलिक नगर ( तामसा रोड) ते मारोतराव कानोडे यांच्या घरापर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे, अंबाजीनगर-पत्रे निवास ते नगरसेवक लंगडे यांच्या घरापर्यंत सी.सी.रस्ता व नाली करणे, तामसा कॉर्नर (डॉ. राऊत रूग्णालय ते तामसा कॉर्नर) सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे, कै. सखारामजी लंगडे नगरातील मुंजाजी लंगडे व संजय वाघमारे यांच्या घरापर्यंत नाली व सी. सी. रस्ता बांधकाम करणे, महात्मा बस्वेश्वर नगर ते
हट्टेकर यांच्या घरापासून ते डॉ. जडे यांच्या घरापर्यंत नाली व सी. सी. रस्ता बांधकाम करण्याकरीता वैशिष्ट पुर्ण अनुदान योजने अंतर्गत ३ कोटीचा निधी नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांनी अव्वल सचिव विवेक कुंभार यांच्या स्वाक्षरीने एकुण रक्कम २ कोटी ९९ लाख ७५ हजार ५२६ एवढी रक्कम नगरपरिषदांना वैशिष्टपुर्ण कामासाठी विशेष – ठोक तरतुद लेखाशिर्ष (२०१८-१९) अर्धापूर नगरपंचायत, जि. नांदेड यास मंजूर केला आहे. सदरील कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यान्वय यंत्रणा राहील असा आदेश पारीत केला आहे. यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे टेंडर दृष्टी इंटरप्रायजेस शास्त्री, नांदेड यांना दिले आहे.