19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeनांदेडस्वारातीम विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ; २२२८३ विद्यार्थ्यांना पदवी जाहीर

स्वारातीम विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ; २२२८३ विद्यार्थ्यांना पदवी जाहीर

एकमत ऑनलाईन

नांदेड : विद्यापीठाचे कुलपती तथा राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षेतेखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षान्त समारंभ मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या समारंभात २२२८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले.यावेळी मुंबई येथून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
ऑनलाईन स्वरूपातील या सोहळयात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मार्गदर्शन केले.विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर आपण समाजाचे काही देणे लागतो,याचे भान ठेवून मार्गक्रमण करावे असे आवाहन केले.

यावेळी उन्हाळी-२०२० परीक्षेत विविध विषयांमध्ये सर्वप्रथम आलेल्या ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक जाहीर केले. याशिवाय ३९० पदविका, १७९१ पदवी, ४५५१ पदव्युत्तर आणि २५१ पीएच.डी.पदवीधारक असे एकूण २२२८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पीएच.डी. विद्यार्थी, विद्यापीठ परिसर, उप-परिसर, न्यु मॉडेल डिग्री कॉलेजच्या ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष पदवी देण्यात येणार आहे. तर तेविसाव्या दीक्षान्त समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आवेदन पत्र सादर केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणा-या पदवी वितरण कार्यक्रमामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत.

पुढे बोलतांना ना.उदय सामंत उपस्थितांना मार्गदर्शन करातांना म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्य अद्वितीय आहे. शैक्षणिक उपक्रमासोबतच इतरही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे हे विद्यापीठ आहे. हरितक्रांती, कोव्हीड लॅब यासारखे सामाजिक बांधिलकीतून निर्माण केलेले उपक्रम हे खरोखर कौतुकास्पद आहेत. विद्यापीठाने शासकीय बी.एड्. कॉलेजला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन केले.विद्यापीठ परिसरामध्ये असे अनेक शैक्षणिक हब निर्माण झाले पाहिजेत. पाश्चिमात्य देशांमध्ये एका विद्यापीठाच्या परिसरामध्ये अनेक शैक्षणिक धोरणे राबविण्यात येतात आणि शैक्षणिक संकुलाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तहान भागविली जाते. याच धर्तीवर आपल्याकडील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जार्चे शिक्षण मिळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे.

मुंबई येथील टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस.रामकृष्णन आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, आज जे पदवीधर होत आहेत त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. एक असे विद्यापीठ जे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने आहे. आज पदवीधर स्नातक म्हणून मी तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ यांना अनुसरण्याचे आहे, त्यांच्या जीवनातून काही मुल्य अंगीकारण्याची विनंती करतो. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ पदवी संपादन करण्यासाठी शिक्षण नाही तर विविध प्रकारची जीवन कौशल्य प्राप्त करण्यासाठी देखील आहे. आपल्या सभोवती अनेक प्रश्न आणि आव्हाने आहेत. त्यापैकी एका अथवा काही तुम्ही संधी म्हणून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे समाजाला आणि देशाला सहाय्यभुत ठरेल. शेवटी ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, विद्यार्थ्यांनी छंद जोपासावा. कुटुंब आणि मित्र यांच्याशी वैयक्तिक संबंध ठेवावेत. आयुष्याच्या ध्येय प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे. यासर्वांचे महत्त्व आपण या साथीच्या रोगात अनुभवलेच असेल.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या उपलब्धी बाबत वैशिष्ट्यपूर्ण आढावा सादर केला. पदवीधारक, सुवर्णपदक पारितोषिक प्राप्त आणि इतर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी योगदान द्यावे आणि विद्यापीठाला उत्कृष्ठतेच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सहाय्य करावी, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. दीक्षान्त समारंभामध्ये सर्वप्रथम दीक्षान्त मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर दीक्षांत समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पृथ्वीराज तौर आणि डॉ.माधुरी देशपांडे यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यापरीषद यासह विविध प्राधिकरणावरील सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासह पालकांची ऑनलाइन उपस्थित होते.

धर्माबाद तालुक्यात,३७ टक्के लसीकरण पूर्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या