21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडकोरोनामय आषाढी वारी-गावागावात पंढरी

कोरोनामय आषाढी वारी-गावागावात पंढरी

एकमत ऑनलाईन

जगात लाखोंचे जीव घेणा-या कोरोनाने मागील दोन वर्षांपासून वारक-यांची व विठुरायाची आषाढीला भेट होऊ दिली नाही. पिढ्यानपिढ्या, वषार्नुवर्षे वारीत खंड पडू न देणारे वारकरी मात्र मागील वर्षी विठुरायाच्या दर्शनापासून वंचित राहिले. डॉक्टर, नर्स, पोलिसासारख्या जीव धोक्यात घालून काम करणा-्या कोरोना योध्यात पांडुरंगाला पाहू लागले. वारी एक ऊर्जा आहे, जी माणसाला माणुसकी जिवंत ठेवण्याची शिकवण देते. मागील वर्षी कोरोना बाधित आमचे भाऊसाहेब महाराज हे निस्सीम हरिभक्त वारकरी हैदराबादच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात इलाजासह भजन हरिपाठामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली असे सुखरूप घरी आल्यावर सांगत होते. याचं कारण म्हणजे भजनात, अभंगात मनोबल वाढवण्याची जी शक्ती आहे ती अन्य कुठेही मिळत नाही.

कठीण परिस्थितीतही संघर्ष करण्याची प्रेरणा इथल्या संतांच्या अभंगात आहे. कोरोना काळात औषधांसह मनोबलाची खूप गरज होती व आजही आहे. कित्येक रुग्ण प्रकृती स्थिर असताना, सर्व सोयीसुविधा असताना केवळ भीतीने कालवश झाले. एवढे भीतीचे वातावरण असल्यामुळे मागील आषाढीची वारी सरकारने रद्द केली. मंदिराची दारं बंद झाली. तरीही वारकरी खचला नाही त्याने कायद्याचा सन्मान करत वषार्नुवर्षाच्या वारीत खंड पाडत घरूनच पांडुरंगाच्या दर्शनावर समाधान मानले. काही नंतर मिसळवलेल्या अतिशयोक्त्या सोडल्या तर वारकरी संप्रदायातील संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखोबा, संत सावता माळी, संत जनाबाई, संत बहिणाबाई, आदी संतांनी आपल्या लिखाणातून व कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य केले आहे.

माणुसकी हा जो संप्रदायाचा गाभा आहे, तो संस्कार होऊन वारक-यांच्या आचरणात भिनला आहे. जात-पात, धर्म-पंथ यापलीकडे वारकरी संप्रदाय हा केवळ मानवहितासह सर्व सजीवांचे हित जोपासणारा विचार व आचरणात आणणारा संस्कार आहे. याचे छोटेसे उदाहरण द्यायचे झाले तर दररोज दारू पिणा-या एका व्यक्तीला मी विचारले, काय दादा आज नील दिसताय. तर तो म्हणाला आर बापू आज एकादशी आहे.

मागील आषाढीला लॉकडाऊन च्या निबंर्धांमुळे वारीपासून वंचित राहावे लागले असले तरी यंदाच्या आषाढीचे चित्र थोडे वेगळे होते. प्रत्येक घटनेच्या वा बाबीच्या दोन बाजू असतात. एका बाजूने विचार केला तर कोरोनानं माणसाला हतबल करून वारीत खंड पाडला. हजारो लोक मृत्युमुखी पडले अजूनही भीतीदायक वातावरण आहे. वारीत खंड ही जीवाला चटका लावणारी व वारक-यांच्या भावनेला नक्कीच मरणयातना देणारी बाब आहे. दुसरी बाजू जर आपण पाहिली तर वारीत जरी खंड पडला असला तरी पूजेत पडला नाही. आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबप्रमुखाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुवादार पावसात स्वत: वाहन चालवत सर्व नियम पाळत पंढरीत जाऊन पूजेची सेवा केली व परंपरा अखंडित ठेवली. यंदाची आषाढी विलोभनीय ठरण्याचे कारण म्हणजे दरवर्षी वारीला जाणा-या वारक-यांनी यंदा भजन, कीर्तन, भारूड, नामसंकीर्तन करून टाळ मृदंगाच्या गजरात आपापली गावे विठ्ठलमय करत पंढरी साकारली. एकादशीचा उपवास हा लहानापासून थोरामोठ्यापर्यंत अनिवार्याच. हा स्वत: स्वत:ला घालून दिलेला नियम होता. त्यामुळे सर्व गोपाळकाला एकत्र येऊन फराळाच्या पंक्ती झाल्या, गावभर दिंडी झाली, काही गावात रिंगणही झालं, हुबेहूब वारीचा आनंद गावागावात साजरा झाला. त्यात बारीकशा बरसणा-या पावसाच्या सरीने आनंद द्विगुणित केला. विशेष म्हणजे हे सर्व उत्सव कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाले.

अशा हर्षोल्हासित वातावरणाने सर्व गावे पंढरीमय झाली होती. प्रत्येक लहान मूल हे विठोबाच्या वेशात दिसत होतं. जणू विठ्ठलच आपल्या भक्तांच्या भेटीला आलाय. यातून हेच जाणवते की विठ्ठल, वारी, पंढरी म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनच होय. एकत्र येणे, सद्गुणांची-पाक विचारांची देवाण घेवाण करणे, सुख-दु:खाची वाटाघाटी करणे यासाठी वारी हे एक खूप मोठे माध्यम आहे. कुणासाठी ती अंधश्रद्धा असेल तर अनेकांसाठी ती जीवणाची ऊर्जा आहे. अखंड प्रेम हेच वारीचे प्रथम व अंतिम ध्येय आहे. शेकडो वर्षांपासून वारी महाराष्ट्राचे प्रबोधन करत आली आहे. इथल्या संतांनी हा आध्यात्मिक व वैज्ञानिक संस्कार आपल्या वाणी व लेखणीने इतका रुजवला आहे की, या मातीतून कायम परिवर्तनाचेच कोंब उगवतील.

– डॉ. विठ्ठल पावडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या