18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेड‘दोन दादां’ची प्रचारात दांडी

‘दोन दादां’ची प्रचारात दांडी

एकमत ऑनलाईन

बिलोली (दादाराव इंगळे) : देगलूर विधानसभा पोट निवडणूकीची रंगत वाढली असून दर दिवशी महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार कॉंग्रेस करीत आहेत तर भारतीय जनता पार्टी एकाकी लढत आहेत. मतदारसंघात २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी १३ ऑक्टोबरनंतर निवडणुकीच्या रिंगणात कोण राहणार हे दृश्य समोर येणार असले तरी दोन राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी प्रचार आणि प्रसाराकडे पाठ फिरवल्यामुळे राष्ट्रीय पक्षातील या दोन दादांची चर्चा मात्र मतदारसंघात चवीने होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भास्करराव पाटील खतगावकर उर्फ दादा यांनी प्रचार आणि प्रसारात सहभागी व्हावे यासाठी दस्तूरखुद्द माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊ न भेट घेतली. त्यांच्या भेटीची छबी देखील सोशल व प्रिंट मिडियामार्फत प्रसिध्द करण्यात आली जेणे करुन भास्करराव पाटील खतगावकर भाजप सोबतच आहेत असे दर्शविण्यात आले असले तरी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच दादांनी प्रचार आणि प्रसाराकडे पाठ फिरवली.

पहिल्या दिवशी आरोग्याचे कारण सांगितले तर दुस-या प्रचार सभेला अनुपस्थिती दर्शवितांना घरात धार्मिक कार्यक्रम चालु असल्याचे सांगितले. एकंदरीत भाजपच्या प्रचाराकडे आजतगायत त्यांनी पाठ फिरवली. त्यांच्या अनुपस्थिती कायम राहिली तर निश्चीतच कॉंग्रेसचे म्हणजे महाआघाडीचे पारडे जड होणार आहे. कारण वर्षानुवर्षे या ठिकाणी भास्करराव पाटील खतगावकरांचा शब्द पाळल्या जातो. त्यांच्या मरजीनुसारच या पुर्वीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही हे भाजपला माहित असल्यामुळेच त्यांना रोज पक्षाकडून प्रचारासाठी गळ घातली जात आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे इच्छूक उमेदवार भीमराव क्षीरसागर उर्फ दादा यांची सुध्दा कथा अशीच आहे. क्षीरसागर यांनी या मतदारसंघात यापुर्वी विधानसभा निवडणूक लढवली आहे. अल्पशा मतांनी व स्वयंपक्षातील नेत्याने त्यांना पराभवाच्या छायेत ढकलले. त्या दिवशीपासून त्यांनी पक्षाचा त्याग करत कॉंग्रेसमध्ये उडी मारली. त्यानंतर सोशल व प्रिंटमिडियामार्फत ना. चव्हाणांसह कॉंग्रेसचा गवगवा केला. भोकर विधानसभा मतदारसंघात देखील महागड्या गाडीतून प्रचार करत ११ हजार लाडू वाटले. तेव्हापासून त्यांना भविष्यात कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार असे वाटत होते. अचानक आ.अंतापूरकर यांचे अकाली निधन झाले आणि विधानसभेची पोट निवडणूक लागली. या निवडणुकीत आपणास उमेदवारी मिळणार याची खात्री होती परंतु त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही.

या मतदारसंघात जवळपास बौध्द समाजाचे ५0 हजारावर मतदान आहे. कॉंग्रेसने बौध्द समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे. भीमराव क्षीरसागर आमच्यासोबत असल्याची वल्गना कॉंग्रेसने केली. त्यांनी देखील बिलोली येथील कुलकर्णी यांच्या फार्महाऊसवर भीमराव यांच्या सोबत फोटो काढून सोशल व प्रिंटमिडिया मार्फत प्रचार आणि प्रसार केला असला तरी क्षीरसागर यांनी अद्यापपर्यंततरी मी कॉंग्रेस सोबत आहे, किंवा माझा पाठिंबा आहे असे जाहिरपणे सांगितले नाही. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी देखील प्रचार आणि प्रसाराकडे पाठ फिरवत पुणे येथे दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्राकडून प्राप्त झाली आहे. त्यांना देखील कॉंग्रेसकडून भ्रमणध्वनीवरुन सातत्याने विचारणा केली जात आहे. त्यांनी कुठलेही कारण न सांगता पुणे गाठल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघात चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे दोन दादांची चर्चा मोठ्या चवीने होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या