22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeनांदेडजिल्हा बँकेच्या बरडशेवाळा शाखेत सावळा गोंधळ

जिल्हा बँकेच्या बरडशेवाळा शाखेत सावळा गोंधळ

एकमत ऑनलाईन

हदगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरडशेवाळा शाखेत अजब कारभार सुरू असून दिवसभर बँकेला कुलूप दिसून येत असले तरी खिडकीतून बाहेर उन्हात थांबलेल्या ग्राहकांशी पैशाचे व्यवहार करण्यात येत आहेत. त्यामुळे कर्मचारी पंख्याखाली सावलीत आणि खातेदार मात्र तळपत्या उन्हात उभे राहून घमाने भिजत आहेत.

हदगाव पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बरडशेवाळा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नेहमीच प्रचंड गर्दी असते. सध्या मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदानाचे वाटप सुरू आहे. तब्बल एक वर्ष चाललेले हे काम अद्यापही संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. येथील कर्मचारी मात्र शेतकऱ्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत आहेत. दिवसभर बँकेला कुलूप लावून ठेवण्यात येत आहे. गोरगरिब शेतकरी आडानी, वृद्ध, महिला यांना दिवसभर उन्हात थांबवण्यात येत आहे. मात्र काही धन दांडगे शेतकरी आणि राजकारणी लोक मात्र मागच्या दाराने बँकेत जाऊन बसून गावातील लोकांच्या पेस्लीप आणून पैशाची उचल करून नेत आहेत.

नुकतेच उंचाडा येथील एका शेतकऱ्याचे मयत आईच्या नावावर असलेली रक्कम पाच वारसदार असतांना दोन वारसदारांनी संगणमत करून व बाकीच्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून परस्पर उचलून नेली. याबाबतची तक्रार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक अजय कदम यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी तातडीने दखल घेऊन शाखा व्यवस्थापक पावडे यांना संबंधित शेतकऱ्यांचे समाधान होईल अशी माहिती पुरवा. आणि त्यांनी मागितलेच तर आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति द्याव्यात अशा सूचना केल्या. त्यामुळे वारस तक्रारदार शेतकऱ्याने बँकेत जाऊन व्यवस्थापकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु आज बँकेचे व्यवस्थापक तर जागेवर नव्हतेच परंतु तिथे असलेल्या दुसऱ्या कानिष्ठ कर्मचाऱ्यांनी बँकेचे कुलूप उघडण्यास नकार दिला. विशेष म्हणजे त्या गेटच्या भोवती एवढी गर्दी होती की कर्मचारी कोणाचे ऐकून घेण्यास सुद्धा तयार नव्हते. बाहेर भिकाऱ्यासारखे शेतकरी बँकेच्या दरात उन्हातान्हात उभे होते. कोणतीही शिस्त नाही, रांग नाही, किंवा बसायला बाक नाहीत, उभे राहायला सावली सुद्धा नाही, प्यायला पाणी नाही. अशा गोंधळाच्या परिस्थितीत वृद्ध महिला शेतकऱ्यांची मात्र परवड होताना दिसून आली. कालच एक वृद्धा चक्कर येऊन पडली होती. त्यांना कोणीही दवाखान्यात नेले नाही. फक्त जागेवर पाणी पाजून गावाकडे पाठवले असे आज सांगण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या अनेक खातेदारांनी या बँकेच्या कर्मचाऱ्यांविषयी मोठा रोष व्यक्त केला.

करमोडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील आणेराव म्हणाले की या शाखेत शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. कोणीही कर्मचारी खातेदाराशी नीट वागत नाहीत. शाखेतील एक बेकायदा शिपायाचे काम करणारा दलाल चिरीमिरी घेऊन लोकांना पेस्लीप देतो. आणि बेकायदेशीर पैसे उचलण्यासाठी मदत करतो.

संजय सूर्यवंशी हे मनाठा येथील शेतकरी म्हणाले की मागील चार दिवसापासून मी चकरा मारतो, पण आज नंबर लागला आहे. मनाठा येथील शाखा बंद झाल्यामुळे तीस किलोमीटर पासून शेतकऱ्यांना या बँकेत खेटे मारावे लागत आहेत. मनाठा येथील बँकेची शाखा पुर्वी प्रमाणेच सुरू करावी अशी आमची मागणी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या