माहूर : श्रीदत्त शिखर संस्थान व दत्तात्रेयांचे निद्रास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्तजन्म विधी सोहळा संपन्न झाला. दर्शनासाठी भाविकांना मोठी गर्दी केली होती. सुलभरीत्या दर्शन घडावे म्हणून मंदिर व्यवस्थापन व प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. साहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत तहसिलदार किशोर यादव, मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड व पत्रकार उपस्थित होते. दत्तशिखर संस्थानच्या दत्त मंदिरात बुधवार दि.७ डिसें. रोजी दू.१२ वा. तर देवदेवेर्श्वर मंदिरात प्रात:काली ४ वा.जन्म विधी सोहळा संपन्न झाला. जन्मोत्सवासाठी दत्त शिखर संस्थान, अनुसया माता मंदिर, सर्वतीर्थ,शहरातील वसमतकर महाराज मठ, वनदेव आश्रम, राम भरोसे महाराज मठ,बसवंते महाराज मठ, बळीराम महाराज मठ,आनंद मठ,संभू भारती, किसन भारती मठ व केरोळी फाटा येथील परमानंद दत्त आश्रमवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दत्त जयंती निमित्त माहूरगडावर येणा-या भाविकांसाठी दत्त शिखर संस्थान, श्रीरेणुकादेवी संस्थान, माहुर शहरात स्वामी समर्थ, नांदेड निवासी सुनील राठोड व माहूर पंचायत समितीच्या वतीने महाप्रसादाची सोय केली आहे. मोठ्या संख्येने भाविक त्याचा लाभ घेत आहेत.