भोकर: येथील एसबीआय बँक शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पुन्हा एकदा बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहे.यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.पंधरा दिवसापुर्वी एसबीआय बँकेतील नांदेड येथून ये-जा करणा-या दोन कर्मचा-यांना कोरोणाची लागण झाल्यामुळे बँक चार दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळीही ग्राहकांची तारांबळ उडाली.
सध्या गणेश चतुर्थी, महालक्ष्मी आदी महत्त्वाची सणांची रेलचेल असल्याने ग्राहकांची पैसे काढण्याची गर्दी या बँकेमध्ये होत आहे. तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील शेतक-यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाल्याने तेवढाच दिलासा शेतक-यांना मिळाला होता आणि ते पैसे काढण्यासाठी शेतक-यांनीही बँकेत गर्दी केली होती. या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सोशल डिस्टंसिंग, तोंडाला मास्क न बांधणे ना सॅनिटायझरींग यामुळे बँकेत येणा-या ग्राहकांना कोरोना लागण होण्याची शक्यता वाढली आहे.
यात गेल्या शनिवारी आणि रविवारी बँकेला सुट्टी होती तर सोमवारी बँकेचे इंटरनेट बंद होते. त्यामुळे हजारो बँक ग्राहक बँकेसमोर पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा करून उभे होते. शेवटी बँकेचे नेट काही आले नाही.त्यात दुस-या दिवशी येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्याने बँक पुन्हा बंद करण्यात आली.
आता पैशाविणा सण वार कसे साजरे करायचे, लेकरा बाळांना काही गोड-धोड कसे खाऊ घालायचे. या विवंचनेत ग्राहक व शेतकरी अडकले आहेत.बँक व्यवस्थापकाने त्वरित या बँकेत व परिसरात सँनिटायझर करून शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळून सणासुदीच्या काळात शेतक-यांना पैसे द्यावेत.अशी मागणी होत आहे.जर पर्याय निघाला नाही तर ग्राहक व शेतक-याच्या घरात या सणासुदीला अंधारच पाहावयास मिळणार एवढे मात्र निश्चित झाले आहे.
राज्यात एसटीला आंतरजिल्हा वाहतुकीची परवानगी