23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडमाहूरच्या रेणुका माता यात्रेची सांगता

माहूरच्या रेणुका माता यात्रेची सांगता

एकमत ऑनलाईन

माहूरगड : कोरोनाच्या कारणास्तव मागील दोन वर्षे परिक्रमा यात्रा पूर्णपणे बंद होती. शासनाचे सर्वच निर्बंध उठताच परीक्रमा यात्रेसाठी भावीकांनी माहुरगडावर मोठी गर्दी केली होती. राखी पौर्णिमा निमित्त श्रीदत्तशिखर संस्थानवर काकडा प्रज्वलित करून दत्त नामाच्या सप्ताहाला सुरुवात होते. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दत्तशीखर संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या गणेश कुंडात तोच काकडा विसर्जित केल्यानंतर परीक्रमा यात्रेची सांगता झाली.
राज्य व पर राज्यातील हजारो दत्त भक्तांनी दत्तात्रेय महाराज की जय असा जयकारा करीत श्रीदत्तशिखर, कमंडलूकुंड, काळेपाणी, अनुसया माता मंदिर,सयामाय टेकडी, मातृतीर्थ तलाव, पांडवलेणी, देवदेवेश्वर, पंचदेवळी, चीलमीचा गोटा, नवनाथ टेकडी, वनदेव, कैलाश टेकडी, शेख फरीदबाबा दर्गाह, सर्वतीर्थ अशा जंगल मार्गाने सुमारे २२ किमी अंतर अनवाणी पायी चालत वेढ्यात ( सह्याद्री पर्वताची परिक्रमा ) सहभाग घेतला. नगर प्रशासनाने पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी आदी मूलभूत सुविधा पुरविण्याचे कर्तव्य पार पाडले नसल्याने महीलासह भाविकांची प्रचंड गैरसोय झाली.

यात्रेसाठी परिवहन महामंडळाच्या माहूर आगाराचे आगार प्रमुख चंद्रशेखर राजेश्वर यांनी चालक व वाहकाच्या साहाय्याने बाहेरील आगाराच्या ३० व माहुर आगाराच्या २० अशा एकूण ५० बसेस दिवसरात्र सुरू ठेवल्याने भाविकांना गडावर जाणे सुलभ झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पो. नि. नामदेव रिठ्ठे यांचे मार्गदर्शनात स.पो.अण्णासाहेब पवार, संजय पवार,श्रीधर जगताप यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी सुसज्ज आरोग्य पथक जागोजाग तैनात करून २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता एन. पी.कोठे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अखंडित विद्युत पुरवठा केला.

दि.१० ऑगस्ट रोजी टी पॉइंट जवळील एटीएम मध्ये सायंकाळच्या सुमारास रोकड नसल्याने व मागील अनेक दिवसापासून आयडिया व वोडा फोनची सेवा मोडकळीस निघाल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. यात्रा काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी अथक परिश्रम घेतले. एकंदरीत प्रचंड गर्दी होऊनही परिक्रमा यात्रा सुरळीत पार पडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या