कंधार : महाराष्ट्रात आता पर्यंत पाचशे पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. २५ पत्रकारांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. ही गंभीर बाब असून राज्य शासनाने राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना योद्धे म्हणून पन्नास लाखाची मदत करावी, अशी मागणी कंधार मराठी पत्रकार संघाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शुक्रवारी तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात कोरोनाचे संकट अधिक उग्र आणि व्यापक होत असल्याचे नमूद करून माध्यम क्षेत्र देखील कोरोना पासून अलिप्त राहिले नसल्याचे म्हटले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना यौध्दे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनाने २५ पत्रकारांचे बळी गेल्या नंतरही एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही.
सरकारने घोषणा केल्या प्रमाणे दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रूपयांची आर्थिक मदत मिळावी. पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री टोपे यांनी पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. यास पंधरा दिवस झाले पण विम्या बाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो तातडीने व्हावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे. पुन्हा अशी वेळ कोणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते.त्यानुसार पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीचे काय झाले ते समजले नाही. दोन्ही पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
केंद्र शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु