27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडअग्नीपथचा वणवा : सिकंदराबाद स्थानकावर रेल्वे जाळली

अग्नीपथचा वणवा : सिकंदराबाद स्थानकावर रेल्वे जाळली

एकमत ऑनलाईन

नांदेड : लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्नीपथ योजनेला अनेक राज्यामधून तीव्र विरोध होत असून तरूणांनी हिंसक आंदोलन सुरू केले आहे़ हिंसाचाराचे लोण आता मराठवाड्यालगत असलेल्या सिकंदाबादमध्ये ही पोहचले आहे़ आक्रमक तरूणांनी रेल्वे स्थानकावर उभी असलेली रेल्वे जाळून आपला रोष व्यक्त केला़दरम्यान या आंदोलनामुळे दक्षिण मध्य विभागातून धावणा-या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी अग्नीपथ योजना जाहिर केली़ या योजनेनूसार लष्करामध्ये चार वर्षासाठी भरती केली जाणार असून त्यातील २५ टक्के जवांनाना १५ वर्षासाठी सेवेत सामावून घेतले जाणार आहे़ मात्र उर्वरीत ७५ टक्के जवानांना बेकारीची संकट येणार आहे, त्यामुळे देशात या योजनेला तीव्र पडसाद उमटत आहेत़ केंद्राच्या या निर्णयाविरोधात हजारो तरूण रस्त्यावर उतरले आहेत.

अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तरूण हिंसक आंदोलन करित आहेत. देशातील बिहार, युपी, हरीयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान येथील आंदोलनाचे लोण आता मराठवाडयालगत असलेल्या सिकंदराबाद येथेही पोहचले आहे़ संतप्त झालेल्या शेकडो तरूणांनी शुक्रवारी दुपारी सिकंदाबाद रेल्वेस्थानकावर उभी असलेल्या रेल्वेला आग लावली.

काही वेळात आगीचा भडका उडाला़ परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठी चार्ज केला़ तरीही तरूणांनी रेल्वे स्थानक परिसरात टायर जाळून तीव्र निषेध नोंदविला़ दरम्यान या आंदोलनामुळे दक्षिण मध्य विभागातून धावणा-या अनेक रेल्वे गाड्यात बदल केला आहे़ यात सिकंदाबाद – तिरूअंनतपुरम ही रेल्वे रद्द करण्यात आली.

तर अंशत: रद्द करण्यात आलेल्या रेल्वेत विजयवाडा – सिकंदाबाद, सिकंदाबाद – विजयवाडा, सिकंदाबाद – तिरूपती, सिकंदाबाद – गुंटूर, सिकंदाबाद – सिरपुर, गुंटूर – सिकंदाबाद, कर्नुल – हैदराबाद या गाडयांचा समावेश आहे़ गुंटूर – विखाराबाद ही रेल्वे अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे़ तर सिकंदाबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस ही निर्धारित वेळेऐवजी सायंकाळी सात वाजता उशीराने धावणार आहे़
गेल्या दोन दिवसापासून या योजनेच्या विरोधात अनेक भागामध्ये जाळपोळ, हिंसाचार सुरु झाला आहे. यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या