22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeनांदेडनांदेडला पुराचा धोका;सर्तकतेचा इशारा

नांदेडला पुराचा धोका;सर्तकतेचा इशारा

एकमत ऑनलाईन

नांदेड (प्रतिनिधी): मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडीच्या वर असलेले मुळा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे जात आहे.यामुळे नांदेडला पुराचा धोका निर्माण झाला असून गोदाकाठच्या जिल्ह्यातील सुमारे ३३७ गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. ही सर्व शक्य अशक्यता लक्षात घेता शुक्रवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनास तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.

जायकवाडी प्रकल्पातून १७ सप्टेंबरच्या रात्री १० वाजल्यापासून १ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, माजलगाव धरणातून ४२ हजार ९०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तसेच पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातून ५ हजार ८२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. हे सर्व पाणी गोदावरी नदीला येवून मिळत असल्यामुळे याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात व गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो. याच बरोबर नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमाड धरणसुद्धा १०० टक्के भरले असून तेथून १ लाख ५० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे.

पोचमाड प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे गोदावरी नदीत फुगवटा निर्माण झाल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ९५ हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाली तर सध्या नांदेड शहरातील गोदावरी नदीचे पाणी धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या जुन्या पुलावर ३४४ पाणी पातळी असून इशारा पातळी ३५१ मीटर आहे. धोका पातळी ३५४ मीटर इतकी असून सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपर्यंत असाच पाऊस चालू राहिला तर गाठू शकेल अशी भिती असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आदी संबंधित विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. राज्याचे पाटबंधारे विभागाचे सचिव एन. व्ही. शिंदे यांनी संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थितीची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

विष्णुपूरीचे पाच दरवाजे उघडले
सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ९५ हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाली तर सध्या नांदेड शहरातील गोदावरी नदीचे पाणी धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या जुन्या पुलावर ३४४ पाणी पातळी असून इशारा पातळी ३५१ मीटर आहे.दरम्यान गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कांदा निर्यातबंदीचा फेरविचार व्हावा- पाशा पटेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या