27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडभयभीत नांदेडकर; कडक उन्हाळा तरी होट्टल उत्सव होणार साजरा

भयभीत नांदेडकर; कडक उन्हाळा तरी होट्टल उत्सव होणार साजरा

एकमत ऑनलाईन

नांदेड : तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून होट्टल उत्सव नांदेडकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे होट्टल उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. यावर्षी मात्र या महोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाकडून १० लाख रुपये तर आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हिवाळ्याऐवजी उन्हाळ्यात करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सध्या नांदेड जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४१ अंशापुढे सरकला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत उन्हाची दाहकता जाणवत आहे. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड शहरामध्ये विविध खूनासह गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नांदेडकर भयभीत झाले आहेत. अशा अवस्थेत होट्टल उत्सव झाला पाहिजे का, याबाबत नांदेडकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

आजपासून ११ एप्रिलपर्यंत तीन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिका-यांना रोजचे काम सोडून या उत्सवाच्या कामासाठी दावणीला बांधण्यात आले आहे. एकीकडे कडक उन्हाळा दुसरीकडे उत्सवाच्या लगबग यामुळे अधिकारी, कर्मचारीदेखील हा महोत्सव आमच्या मुळावरच आला आहे, अशा प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक पाहता हा महोत्सव हिवाळ्यात साजरा झाला असता तर सर्वांनाच आनंद घेता आला असता परंतु जिल्हा प्रशासनाच्या बालहट्टामुळे भर उन्हाळ्यात हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नांदेड शहर गेल्या आठ दिवसांपासून भयभीत झाले आहे. कोरोनापूर्वी खंडणी बहाद्दरांनी अनेक नामवंत व्यापा-यांना टार्गेट करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्या दिवसापासूनच नांदेड शहर गोळीबारीमुळे चर्चेत आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी यावर अंकुश बसवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोरोनानंतर पुन्हा एकदा कुप्रसिद्ध गुंडांनी डोके वर काढल्यामुळे शहरात दरदिवशी गोळीबार होत असल्याचे दिसत आहे. शहरातील व्यापारी, बिल्डर्स भयभीत झाले आहेत. कधी कोणती घटना घडेल, हे सांगणे आता कठीण झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी कौठा परिसरातील ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर एका गुंडाने तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घोरबांड यांनी आपल्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून गुंडाला जखमी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा पुन्हा एकदा नांदेडमध्ये भयानक घटना घडली असती. असे वातावरण असताना जिल्हा प्रशासनाला होट्टल महोत्सव साजरा करावाच कसा वाटतो, असा सवाल सामान्य नागरिकांतून पुढे येत आहे.

याच समारंभासाठी दस्तुरखुद्द पालकमंत्रीदेखील उपस्थिती दर्शविणार आहेत. कोल्हापूर येथून विमानाने हैदराबाद येथे येणार आहेत. त्यानंतर देगलूरमार्गे होट्टलच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार असल्यामुळे पालकमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात असा कसा निर्णय घेतला, अशी उलटसुलट चर्चा होताना शहरात पहावयास मिळत आहे. एरवी पालकमंत्री कुठला कार्यक्रम असेल तर त्यासंदर्भात चौकशी करूनच हजेरी लावतात. परंतु या कार्यक्रमाबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली की नाही, यासंदर्भात साशंकता व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य मार्गदर्शन केले नसावे, असेही काही जणांनी बोलून दाखवले. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकादेखील चांगलीच गाजली. यासंदर्भात अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर सावरासावर करीत दुस-या निमंत्रण पत्रिका जिल्हा प्रशासनाला काढाव्या लागल्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.

कला सादर करायची असेल तर अर्ज सादर करा; कलाकारांचा अवमान
प्रत्येक कलाकार हा स्वाभिमानी असतो. मानधनापेक्षा मान-सन्मानाला महत्त्व देतो, हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु यावेळी जिल्हा प्रशासनाने मात्र स्थानिक कलावंतांना आणि त्यांच्या सहका-यांना संधी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अर्ज मागवले. कार्यक्रम निश्चित करताना अर्ज केलेल्या सर्वच कलावंतांना संधी दिली, असा मोठेपणा जिल्हा प्रशासन दाखवत असले तरी संगीत, गायन क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांना यासंदर्भात नाराजी व्यक्त करत पहिल्यांदाच कलाकारांकडून अर्ज मागवण्याची पद्धत सुरू करण्यात आली हा कलाकारांचा अवमान नव्हे का, असेही काही कलाकारांनी उघडपणे बोलून दाखवत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या