नांदेड : मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढल्याने पोलीसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल सतरा महिन्यांपासून मोबाईल चोरीच्या गुन्ह्या फरार असलेल्या आरोपीस जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरलेला मोबाईलही जप्त केला आहे.
दि़ १९ एप्रिल २०२१ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला आपल्याच घरासमोर मोबाईलवर बोलत थांबली होती. तेंव्हा दोन अनोळखी दुचाकीस्वार त्यांच्याकडे जोरात गाडी चालवत आले आणि सदर महिलेचा २२ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून नेला. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२१ दाखल झाला होता. त्यानंतर शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांना प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार महिलेचा बळजबरी चोरलेला मोबाईल किनवट येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून त्यांनी शिवाजीनगरचे गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, देवसिंग सिंगल, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, दत्ता वडजे, शेख अझहर यांनी किनवट येथून चंद्रमुनी देविदास खाडे (२४ रा़ झेंडा चौक, नांदेड) यास ताब्यात घेतले. त्याने महिलेचा बळजबरीने हिसकावलेला २२ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. सदर कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीसी अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोनि द्वारकादास चिखलीकर यांनी शिवाजीनगर पोलिसांचे कौतुक केले.