नांदेड : आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज सायंकाळी ६.३० वाजेनंतर आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस टाकून वीज ग्राहकांना गंडा घालण्यात येत आहेतÞ याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येताच अशा मेसेज प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येण-या आपला वीजपुरवठा खंडीत करण्याबाबतच्या संबंधित एसएमएस किंवा व्हॉट्स ऍप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात. या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिका-याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही.
महावितरणकडून केवळ एसएमएसद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहेत व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरूअसलेल्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.