नांदेड : चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणा-या महिला टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करून दोन महिलांना अटक केली़ त्यांच्याकडून वेगवेळ्या चोरीच्या घटनेतील एक लाख ६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या टोळीतील एक चोरटा फरार झाला आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंकुर हॉस्पिटलजवळ आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या माधव आप्पाराव मोरे रा़ आलेगाव ताक़ंधार यांना दोन अनोळखी महिला आणि एक पुरुष अशा तिघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील नगदी तीन हजार ४०० रुपये, बारा हजार ५०० चा मोबाईल व एक दुचाकी असा एकूण ६५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून त्यांच्याच दुचाकीवरून पळून गेले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोनि डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ शेख इब्राहिम, पोना रवी बामणे, दिलीप राठोड, देवीसिंग सिंगल, शेख अजहर यांनी अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील संशयित महिला गंगासागर उर्फ माया राजू माथेकर (वय ३०), सीमा संतोष निळकंठे (वय २७) या दोघींना जेरबंद केले़ त्यांच्याकडून चोरीला गेलेली पॅशन प्रो कंपनीची दुचाकी,
एक मोबाईल, नगदी ३ हजार ४०० रुपये असा एकूण ६५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासह त्यांनी अन्य चोरीच्या घटनेत वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले ९५ हजार रूपये किंमतीचे सात अँड्रॉइड मोबाइल असा एक लाख ६० हजार ४१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील एक चोरटा मात्र फरार आहे़ पोलीस त्याचा शोध घेत आहेत़