माहूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झालेला रस्ता कंत्राटदाराने गेल्या अनेक महिन्यापासून खोदून ठेवल्याने तालुक्यातील मौजे मेट गावातील व परिसरातील नागरिकांच्या हालाला पारावार उरला नाही.हा रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा गोरसेनेने दिला आहे.
माहूर तालुक्यातील मौजे मेट या गावचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंर्तगत माहे ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु झाले असून खान कंन्ट्रक्शन वाई बा.या कंत्राटदाराने कामाला सुरुवात करण्यासाठी रस्ता खोदून ठेवला व तो रस्ताही खराब झाला असल्याने मेट व परिसरातील गावातील नागरिकांना आता या रस्त्याने पायीसुद्धा जाता येत नाही. तसेच रस्त्याच्या कामासाठी टाकलेले मुरुम व गिठ्ठीमुळे जवळ असलेली वाहने घरातच पडून आहेत.
सदरील रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. कुठलेही वाहन गावात येत नाही त्या मुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करा,अन्यथा गोर सेनेकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल अशा आशयाचे निवेदन गोरसेनेचे माहूर तालुका सचिव प्रल्हाद राठोड रा.मेट यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी-१ यांना दिले. यावेळी मौजे मेट येथील सामाजिक कार्यकर्ते व गोरसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.