नांदेड : नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वादाच्या भोव-यांत सापडणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले असून, गुजराती, राजस्थानी राज्यातून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. राज्यातील विरोधी पक्षासह नागरिकांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर नांदेडमध्ये शनिवारी दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रसच्यावतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून जर गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी केले आहे. ते मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालाल कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असून त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.
दरम्यान याचे पडसाद नांदेडातही उमटले असून शनिवार दि. ३० रोजी दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील आयटीआय चौकात राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. या कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार घोषबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्ये उपस्थित होते.