नांदेड : स्वत:च्या ताब्यातील गावठाणाचा प्लॉट ग्रामपंचायतच्या नमुना ८ वर लावण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दिड लाखाची लाच घेतांना राहटी येथील ग्रामविकास अधिकारी हनुमंत वाडेकर व खाजगी इसम बालाजी वाघमारे यास रंगेहात जेरबंद करण्यात आले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई नाथनगर येथील निवासस्थान परिसरात करण्यात आली.
नांदेड तालुक्यातील राहटी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून हनुमत वाडेकर हे कार्यरत आहेत. गावातील रहिवासी तथा तक्रारदार यांचा त्यांच्या घराच्या बाजूला गावठाणात असलेल्या प्लॉट गेल्या ५0 वर्षापासून ताब्यात आहे. सदरील प्लॉट ग्रामपंचायतच्या नमुना नं८ वर लावण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वाडेकर यांनी दिड लाख लाचेची मागणी केली. या संदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलूचपतच्या अधिका-यांनी यासंदर्भात पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली यात वाडेकर यांनी तक्रारदाराकडे दिड लाखाची लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर विस्तारीत नाथनगर येथील हणमंत वाडेकर यांच्या निवासस्थान परिसरात सापळा लावण्यात आला. यात वाडेकर याने खासगी इसम बालाजी वाघमारे रा. कर्मविरनगर नांदेड याच्या मार्फत दिड लाख रुपयाची लाच स्वीकरल्यानंतर दोघांनाही जेरबंद करण्यात आले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, आप्पर पो.अ. अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राजेश पुरी, कपील शळके, पो.ना. एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, नरेंद्र बोडके, महिला पोलिस आशा गायकवाड यांनी यशस्वी केली. तब्बल दिड लाख रुपयाची लाच घेतांना ग्रामविकास अधिका-यास पकडल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात