कंधार : प्रतिनिधी
कुरुळा येथील ह.भ.प. ज्ञानोबा माऊली कुरुळेकर यांचे ता.९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास देहावसान झाले.अंत्यसंस्कार समयी महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेल्या कीर्तनकार,भक्त,शिष्य मंडळीनी साश्रूनयनांनी महाराजांना अखेरचा निरोप दिला.
कुरुळा येथील श्री गुरू ह.भ.प. हणमंतराव पाटील चिवडे यांनी स्थापिलेल्या हणमंतराव महाराज मठसंस्थानचे ह.भ.प.ज्ञानोबा लक्ष्मण पा. चिवडे कुरुळेकर सातवी गादी यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला.त्यांनी अजन्म ब्रह्मचर्य अंगिकारून अनेकांना सन्मार्गाकडे वळवले.नांदेड जिल्ह्यासह परभणी,उस्मानाबाद,लातूर,उदगीर आदी भागात त्यांचे शिष्यगण आहेत.शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कोणत्याही ऐहिक सुखाचा उपभोग घेतला नाही.
कोरोना काळातही त्यांनी अन्नछत्र चालवून गरजूंना आधार दिला होता.त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे अनेक महंत, महाराज यांनी आपल्या शोकसंदेशात भावना व्यक्त केली.सायंकाळी पाच वाजता विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शिष्यगणाचा अलोट जनसागर उपस्थित होता.