धर्माबाद (प्रतिनिधी) : नगर परिषद क्षेत्रातील रत्नाळी येथील तलावातून मुरूमाचे जेसीबी मशीनने अवैध उत्खनन करून वाहतूक करताना रत्नाळीच्या गावक-यांनी केटी कन्स्ट्रक्शनच्या कामगार व अभियंत्यांना मंगळवारी रंगेहात पकडले. यानंतर तलाठी व मंडळ अधिका-यांनी घटनास्थळी पंचनामा करून सदरील जेसीबी यंत्र जप्त केले.
धर्माबाद ते तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत राज्य माहामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून, त्याचे कंत्राट केटी कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणार मुरूम कंपनीचे अभियंते व कामगार रत्नाळी येथील तलावातून अवैधरित्या उत्खनन करून त्याची वाहतूक करीत असल्याची माहिती रत्नाळी येथील विठ्ठलराव कोंडलवाडे, श्रीनीवास मल्लेपेल्लू, संजीव रेड्डी, पंढरीनाथ कोंडलवाडे, बेंद्रे बाबू यांच्यासह गावक-यांना मिळाली होती. गावक-यांनी रत्नाळी येथील तलावात जाऊन संबंधित अभियंता व कामगारांना सदरील कामाची परवानगी आहे का, अशी विचारणा करेपर्यंत गोंधळाचा फायदा घेत मुरूमाने भरलेल्या चार ते पाच हायवा गाड्या पसार झाल्या. यावेळी एका हायवा गाडीचा क्रमांक (केए ५८ – ४३२०) गावक-यांच्या नजरेस पडला.
घटनेची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे व पोलिस प्रशासनाला देण्यात आली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुरुम उत्खनन व वाहतुकीच्या परवानगीबाबत विचारले असता केटी कन्स्ट्रक्शनचे अभियंता पांडे यांनी तशी परवानगी नसल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे, लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पाथरडकर तसेच तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनीही आपल्या कार्यालयातून अशी कोणतीही परवानगी दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर गावकरी व पत्रकारांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्या ठिकाणी असलेले जेसीबी यंत्र जप्त करून पंचनामा करण्याचे आदेश मंडळ अधिकारी तेजेस कुलकर्णी व तलाठी सहदेव बासरे यांना दिले. त्यानुसार त्या दोघांनी जेसीबी यंत्र जप्त केले. आता तहसीलदार शिंदे या कंपनीवर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सदरील कामाची परवानगी संबंधितांकडे नसल्यास त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे ‘एकमत’ला सांगितले.