माहूर : माहूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक नियोजित जागेवर वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी दोन दिवसात बंद करा अन्यथा स्मारकाच्या ठिकाणी बोंबा मारो जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने नगर पंचायत मुख्याधिकारी किशोर यादव यांना निवेदनातून दिला आहे.
माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही माहूर नगरपंचायत प्रशासनाचे शहरातील स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. शहरातील अनेक महत्वपूर्ण सार्वजनिक ठिकाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. शहरातील अंतर्गत नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. नगरपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर व बसस्थानकासमोरील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाजूच्या हॉटेलमधील दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहून येत आहे.
यामुळे प्रचंद दुर्गंधी परिसरात पोहोचली असून, त्यामुळे माहुरकरांसह डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याकडे दोन दिवसांत लक्ष न दिल्यास आंदोलन केले जाईल, असे प्रहार जनशक्ती पक्षाने म्हटले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष अमजद खान लालखान पठाण, युवा तालुका उपाध्यक्ष एकनाथ मानकर, विधानसभा सचिव शिवचरण राठोड, शुभाष दवणे, सज्जन भगत, कुणाला राठोड, संकेत राठोड, शंकर राठोड, रोशन राठोड, आकाश चव्हाण, संपर्कप्रमुख सुभाष दवणे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.