नांदेड : मोबाईल कॉलवर महावितरणचे नाव सांगून एका सेवानिवृत्त अभियंत्याला अज्ञात भामट्यांनी ६ लाख रुपयांना गंडवले. अभियंत्याच्या खात्यात एकूण १९ लाख रुपये रक्कम होती. सुदैवाने उर्वरित रक्कम सुरक्षित राहिली़ या प्रकरणी भाग्यानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेवानिवृत्त अभियंता गौतम मारोती भावे यांना दि़ २७ मे रोजी अज्ञात भामटयाचा कॉल आला. कॉलवर बोलणा-या भामटयाने, तुमचे महाविरणचे ४५० रुपये बिल बाकी आहे. भावे यांनी लगेच होकार दिला. योनो अॅपवर भावे यांना १०० रुपये भरण्याची सुचना करण्यात आली.
त्यानुसार त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर त्यांना एक लिंक देण्यात आली आणि ती लिंक उघडण्यास सांगितले. सोबतच तुमचा मोबाईल चालू ठेवा आम्ही तुमचे काम पुर्ण करून देतो असे सांगितले. या सर्व वेळेत ठकसेनांनी त्यांच्या मोबाईलचा डाटा एक्सेस केला आणि त्यांच्या बँक खात्यातून ६ लाख रुपये वळती करून घेतले. ही सर्व फसवणूक मोबाईल क्रमांक ९०६२३८३९३२ आणि दुस-या एका मोबाईलवरून झाली. याबाबतची तक्रार दि़ २ जून रोजी सेवानिवृत्त अभियंता गौतम मारोती भावे यांनी दिली.
भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा कलम ४२० नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भारती वाठोरे करीत आहेत. दरम्यान सेवानिवृत्त अभियंता भावे यांच्या बँक खात्यामध्ये एकूण १९ लाख रुपये शिल्लक होते. भामटयांनी केवळ ६ लाख काढून घेतले मात्र सुदैवाने उर्वरित रक्कम शिल्लक राहिली़ दरम्यान पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी, मोबाईलवर आलेल्या कॉलच्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावर, कोण्या कंपनीचे नाव सांगून बोलत असेल तर त्यावर विश्र्वास ठेवू नका असा कोणताही कॉल आला. तर त्याला प्रतिसाद देवू नये असे आवहन केले आहे़