24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडरखरखत्या उन्हात बळीराजा हंगामपूर्व शेती कामात व्यस्त

रखरखत्या उन्हात बळीराजा हंगामपूर्व शेती कामात व्यस्त

एकमत ऑनलाईन

कंधार : यंदा वेळेवर पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामपूर्व शेती कामे आटोपत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी रखरखत्या उन्हातही बळीराजा शेतीकामांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

गेल्यावर्षी तालुक्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. सध्या वैशाख वणवा आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

अशा परिस्थितीत काही शेतकरी आपल्या बैलजोडीद्वारे शेतातील हंगामपूर्व कामे आटोपत आहेत. ज्या शेतक-यांकडे बैलजोड्या नाहीत, असे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही कामे करीत आहेत. दरम्यान, इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरवरील मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे.

ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे केल्यामुळे वेळेची बचत होते. याशिवाय, ट्रॅक्टर सहजपणे उपलब्ध होते. तसेच शेतीची नांगरणी खोलवर होते. त्यामुळे शेतक-यांचा कल ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे आहे. शेती कामे आटोपलेले शेतकरी आता बी वियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यासाठी बाजारपेठेत चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहेत. यंदा खत बियाणांचे दर वाढले असल्याचे दिसून येत आहे.

उन्हाची तीव्रता वाढलेलीच आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे कठीण असतानाही ग्रामीण भागातील शेतकरी या वेळेत थोडीशी विश्रांती घेत पुन्हा शेती कामे करीत आहेत. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीची कामे करण्यासाठी यंदा शेतक-यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकरी आर्थिक उलाढाल करीत शेतीकामे करीत आहेत. सध्या नांगरणी, जमिनीचे सपाटीकरण, बांध दुरुस्ती अशी कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात येत आहेत. याशिवाय, धसकट वेचणे, बांध बंदिस्ती अशी कामे केली जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या