लोहा : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निरोगी, निकोप राहण्यासाठी योग साधनेची नितांत आवश्यकता दिसून येते, अशी योग संस्कृती जगभरात रुजविण्यासाठी भारतीय ऋषीमुनींनी असामान्य परिश्रम घेतले आहेत. म्हणूनच आज सबंध जगाला योग साधनेची नोंद घेणे गरजेचे वाटले.
त्यातूनच २१ जून अंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आज जगभरात साजरा होत आहे. असे प्रतीपादन श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा च्या रा. से. यो. विभाग, क्रीडा विभाग व एन. सी. सी. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोकराव गवते साहेब यांनी केले.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री व्ही.जी.चव्हाण साहेब हे होते, तर या योग शिबिरामध्ये लोहा येथील योग शिक्षक श्री बालाजी जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व योगाभ्यासाचे धडे दिले. या वेळी बोलताना प्राचार्य डॉ.अशोकराव गवते यांनी म्हटले कि, कोणत्याही लोकोपयोगी व कल्याणकारी योजनाची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी राजकीय क्षेत्रातून पुढाकाराची आवश्यकता असते म्हणूनच योग साधनेच्या देशभरात व जगभरात प्रचार प्रसाराचे, तसेच युनो मध्ये २१ जुन या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना द्यावे लागेल.