किनवट : शेतक-यांनी आर्थीकोन्नतीसाठी पारंपारीक शेतीला बग्गल देत रेशीम शेतीची कास धरणे काळाची गरज आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध संकटांना तोंड देण्याशिवाय शेतक-यांच्या हाती कांहीच नाही. प्रशासनाकडून जास्तीत जास्त आणि वेळोवेळी कसे सहकार्य करता येईल, त्यासाठी कांहीच अडचण येणार नसल्याचे दिलासादायक उद्गार प्रधानसांगवी येथिल रेशीमशेती करणा-या शेतक-यांसमोर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी काढले.
२१ ऑक्टोंबर २०२० रोजी प्रधानसांगवी येथिल रेशीमशेती करणा-या शेतक-यांच्या शेतावर जाऊन संगोपणगृह, रेशीमशेती, तुती व तयार झालेल्या कोषांची पहाणी केली. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामसेवक जाधव, तलाठी बालाजी वसमतकर, मंडळ अधिकारी जोशी, आत्मा प्रकल्पाचे पटवे होते. सरपंच किरवले आणि उपसरपंच पद्माकर आरसोड यांच्या शेतावरचा त्यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन शेतक-यांच्याही समस्या जाणून घेतल्या. रेशीमशेती ही लोकचळवळ व्हावी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी पुजार यांनी प्रधानसांगवी सभोवतालच्या दहा-पाच गावातील शेतक-यांना रेशीमशेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच महत्वाची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रेशीमशेतीसाठी कुशल व अकुशल अशा पद्धतीचे अर्थसहाय्य दिल्या जाते. ते कोणाला मिळाले तर कोणाला मिळालेच नाही. स्वखर्चाने संगोपणगृह उभारली असल्याची व्यथा सरपंचपती विठ्ठलराव किरवले यांनी मांडल्या. खरे तर रेशीमशेतीसाठी प्रेरीत झालेल्या शेतक-यांना वेळोवेळी शासन सहाय्य मिळायला हवे. कसाबसा कोष तयार झाला तर त्याला योग्य मार्केट मिळत नाही. शिवाय खरेदीदारांकडून मिळावा तसा भाव मिळत नसल्याची व्यथाही मांडली. मांडलेल्या पैकी अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रेशीमशेतीधारक ईश्वर मुंडे, विलास कानवटे, पांडुरंग केंद्रे, बिभिषण गीते, श्रीकांत कागणे, नागनाथ कागणे, रावसाहेब कानवटे, गोपाळ घुकसे, शिपाई घाटाने व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरग्रस्त भागाला आमदार प्रणिती शिंदे यांची भेट