कंधार : श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी कंधार व लोहा शहरातील रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना व वैद्यकीय सेवेतील कर्मचा-यांना जेवणाची सोय व्हावी म्हणून भाऊचा डब्बा हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. १ मे २०२१ रोजी संकल्प करून सुरू केलेल्या भाऊच्या डब्याने बघता बघता ४०० दिवसांचा टप्पा गाठला असून आजही हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आज जरी कमी झाला असला तरी कंधार, लोहा येथील रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भाऊचा डब्बा आजही पुरविला जात आहे. माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवराव धोडगे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी अहोरात्र प्रयत्न करुन न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे करीत असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी भाऊचा डब्बा हा उपक्रम चालू केला आहे.
कोरोना काळात प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सर्व प्रथम लोहा, कंधार येथील खाजगी व सरकारी सेवेतील डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचा-यांना मास्क व पी.पी.ई. किटचे वाटप केले. लोहा व कंधार तालुक्यातील ज्या पाल्यांचे पालकत्व कोरोणामुळे हिरावले गेले, अशा पाल्यांच्या १ ली ते महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी स्विकारुन जिथे कमी तिथे आम्ही हे सिद्ध केले.
महाराष्ट्रातील एस.टी महामंडळातील कर्मचा-यांनी संप पुकारला. शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचा-यांनी संप पुकारला. या संपातील सहभागी कर्मचा-यांना प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी भेटून त्याची विचारपूस केली. जोपर्यंत संप सुरू आहे. तोपर्यंत कंधार आगारातील संपातील सहभागी कर्मचा-यांना भाऊचा डब्बा दिला जाईल असे सांगितले व कंधार आगारातील एस.टी महामंडळातील सहभागी कर्मचा-यांना संपाच्या काळात भाऊचा डब्बा पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासली. प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या या सामाजिक कार्याचे कंधार व लोहा तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे.