नांदेड : प्रतिनिधी
प्रत्येकाला आपल्या लेखणीतून व्यक्त होता आले पाहिजे, चुकीच्या ठिकाणी पत्रकारांनी आवाज उठवून निर्भीडपणे पत्रकारीता करावी, सत्य आधारीत पत्रकारीता जिवंत राहते़, पत्रकारांची बुध्दी नेहमीच चौकस असते असे प्रतिपादन दुरसंचारच्या निवेदीका मनाली दिक्षीत यांनी केले आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी दि़ १२ फेब्रुवारी रोजी आनंदसागर मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता, यावेळी प्रमुख मार्गदर्शीका म्हणून मनाली दिक्षीत या बोलत होत्या.
त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की, पत्रकारांच्या अडचणी समजून घेणारा नेता खा़ प्रताप पाटील चिखलीकर हे असून, त्यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना बोलावून त्यांचा सन्मान करण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे़ पत्रकारांना भेटीच्या माध्यमातून प्रेम दिले आहे. पत्रकारांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव होणे हे अत्यंत गरजेचे असून, त्यांना यामुळे काम करण्याची उर्जा मिळते़ असे दिक्षीत बोलतांना म्हणाल्या.