नांदेड: प्रतिनिधी
मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राशनच्या तांदळामध्ये भ्रष्टाचार होत असून, चोरट्या मार्गाने या तांदळाची विक्री होत आहे. काल सायंकाळी अर्धापुर पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा १३ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या ५५ टन तांदळासह ३७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गरीबांना परवडेल अशा दरात शासनाकडून राशन दुकानावर धान्य वाटप केले जाते. यामध्ये तांदूळ, गहू हे धान्य दिल्या जाते. मात्र या धान्यामध्ये घोटाळा करून काहीजण अवैधरीत्या या धान्याची विक्री करत आहेत. दरम्यान दि.११ जुलै रोजी अर्धापुर पोलिसांंनी काळ्या बाजारात जाणारा ५५ टन तांदुळ जप्त केला. अर्धापुर ते भोकर फाटा रस्त्यावर चौधरी धाब्याजवळ शासकीय वितरण व्यवस्थेतील तांदुळसाठा असलेले दोन ट्रक उभे आहेत. या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून ट्रक (क्रमांक जीजे-२५-यु-८०९७) मधून ६ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २७ टन तांदूळ व ट्रक (क्रमांक जीजे-३६-व्ही-२९७९) मधून सात लाख रूपये किंमतीचा २७ टन तांदूळ असा एकूण १३ लाख ५० हजार रूपये किंमतीचा तांदूळ व २४ लाख रूपये किंमतीचे दोन ट्रक असा ३७ लाख ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकणात पोलिसानी ट्रकचालक हिराभाई रामभाई सिंधलं (वय २७ रा. राणावाव ता. राणावाव जि. पोरबंदर), भरत चन्नभाई वडेदरा (वय ३२ रा देवडा ता कुतीयला जि पोरबंदर यांच्यासह तांदुळ मालक भास्कर गोपाळ नोन (रा. सरस्वतीनगर हैद्राबाद) व मोहम्मद पाशा मोहम्मद इस्माईल (रा. मेढक जहिराबाद) या चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोउपनि कपिल मुरलीधर आगलावे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात गुरन २०२/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोनि जाधव हे करीत आहेत.