केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या दि.३१ ऑगस्ट रोजीच्या निर्देशानुसार लॉकडाऊन दि.३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, उपपरिसर, लातूर व परभणी, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली तसेच कै.उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व संकुलाचे संचालक, प्रशासकीय विभागप्रमुख तसेच संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदरील आदेशाचे पालन करावे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लॉकडाऊन कालावधी दरम्यान विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागातील वर्ग १ व वर्ग २ शिक्षकेत्तर अधिकाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के करण्यात आलेली आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य करण्यात आलेली आहे.
विद्यापीठाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालय, प्रशासकीय विभाग, उपपरिसर येथील कार्यालयातील कामे उदा. ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबविणे. उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन क्लाससाठी पूर्वतयारी म्हणून तासिकांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तयार करणे, ई-ग्रंथालयाच्या माधमातून विद्यार्थ्यांना ई-बुक पुरविणे, अभ्यासक्रमाचे ई-कन्टेन तयार करणे, कोविड-१९च्या अनुषंगाने विद्यमान शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाने किंवा शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार गुणात्मक रोजगाराभिमुख, समाजाभिमुख, शिक्षण विद्यार्थांना देणे आदी कामाचा आराखडा तयार करणे, इत्यादी व तत्सम बाबी संदर्भात कार्य करण्यासाठी संलग्नित महाविद्यालयातील अध्यापक किंवा विद्यापीठ विभागातील अध्यापकांनी महाविद्यालयामध्ये किंवा विभागामध्ये ३० सप्टेंबर पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अवश्यकता नसून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वेय निर्गमित केलेल्या सूचनेनुसार वर्क फार्म होम याप्रमाणे ऑनलाईनद्वारे नियमामध्ये विहित केल्यानुसार सर्व संबधित प्राचार्य, अध्यापक व कर्मचाऱ्यांनी निर्धारित करण्यात आलेली कर्त्यव्य पूर्ण करावीत. परंतु विद्यापीठास किंवा महाविद्यालयास अध्यापकांची किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवेची अवश्यकता असल्यास सर्व संबधितांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
कार्यालयीन कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कर्तव्य बजावीत असताना आपत्ती व्यवस्थापन नियमामध्ये विहित केल्यानुसार सामाजिक, शारिरीक किमान सहा फुट अंतर ठेवणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे, प्रवेश व निर्गम ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायजर व हात धुण्याची जागा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, कार्यालयीन परिसर व दरवाजाचे हॅडल नियमानुसार निर्जंतुकीकरण करणे इत्यादि व तत्सम बाबीसंदर्भात नियमाचे अनुपालन करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची असणार आहे, असेही परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.