22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeनांदेडलॉकडाऊन संपला... तसा पानविडा रंगला...!

लॉकडाऊन संपला… तसा पानविडा रंगला…!

एकमत ऑनलाईन

अर्धापूर (रामराव भालेराव) : राज्यासह जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे दळणवळण व बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतक-यांना आपल्या शेतातील उत्पादित माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. यातून नागवेली पानाचे उत्पन्न करणारा बागायतदार शेतकरी सुध्दा सुटला नाही. यात त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. पण मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली असून भावही ब-यापैकी मिळत आहे. त्यामुळेच नागवेली पान उत्पादक शेतक-यांना अच्छे दिन आले असून लॉकडाऊन संपला आणि पान विडा रंगला. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील अनेक शेतकरी नागवेली पानाची लागवड करतात. येथील पानांची चव सर्वदूर पसरली असून येथील नागवेली पान प्रसिद्ध आहे. या नागवेली पान मळ्यातून वषार्काठीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु मागील वर्षभरापासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याने नागवेली पानाची मागणी बंद झाली होती. आणि नागवेली पान उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला होता.

लॉकडाऊन काळात नागवेली पानाला कवडीमोल दर मिळू लागला होता. पान तोडणा-या मजुरांची मजुरी सुद्धा निघत नव्हती. लग्न सराईत नागवेली पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु लग्न सराईतच लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभ बंद होते. परिणामी नागवेली पानाला मागणी नसल्यामूळे अनेक शेतक-्यांनी पान तोडणी बंदच केली होती. पान तोडणीस येत नसल्याने पान वाळून जात होते. परंतु मागील आठवड्यापासून राज्यासह जिल्हा अनलॉक करण्यात आल्याने नागवेली पानाची मागणी वाढली असून ५० ते ६० रुपये शेकडा पान विकल्या जात आहेत. सध्या श्रीरामपूर, परभणी, जळगांव, नाशिक, भुसावळ, अहमदनगर, नागपूर आदी शहरासह गुजरात राज्यातून पानांची मागणी वाढली असून लॉकडाऊन संपताच पानाचा विडा रंगला आहे.

गेल्या दोन वषार्पासून नागवेली पान उत्पादक शेतक-यांना सारखा फटका बसत असल्यामुळे अनेक शेतक-यांनी आपला मळा काढून टाकला आहे. त्यातच उत्पादन कमी झाले आणि मागणी वाढली. त्यामुळे येणा-ाा काळात नागवेलीच्या पानांची मागणी वाढेल आणि भावही स्थिर राहतील. अशी अपेक्षा चाभरा येथील नागवेली पान उत्पादक शेतकरी शंकरराव मरकुंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

बँकेबाहेर शेतकरी बसले ताटकळत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या