नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी गुरुवार ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या मधील तरतुदीनुसार १४ मार्च रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश ३१ ऑक्टोंबर, ४ व १५ नोव्हेंबरमधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात गुरुवार ३१ डिसेंबरपर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करणा-या सर्व अधिका-यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचा-यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात १३८ कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू, ९३ नवे बाधित