नांदेड : प्रतिनिधी
पुढील काळात देशातील रस्ते अमेरिकेपेक्षा ही चांगले बनविण्यात येतील, असा विश्वास देत नागपूर – रत्नागिरी हा चारपदरी महामार्ग नांदेडमधून जाणार आहे. या मार्गासाठी ३० हजारा कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. देशातील रस्ते विकासाचे शिल्पकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ंिहगोली गेट येथील गुरुव्दारा मैदान येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात मुदखेड-नांदेड या राष्ट्रीय महामार्गाचे ऑनलाईन भूमीपूजन करण्यात आले. सोबतच नांदेड-जळकोट,कुंद्राळा-वझर,भोकर-सरसम, बारसगाव-राहटी या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, खा. सुधाकर श्रृंगारे, आ.भीमराव केराम, आ.डॉ.तुषार राठोड, आ.राजेश पवार,आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, आ. शामसुंदर शिंदे, माजी आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, ऍड. चैतन्यबापू देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, गेल्या ५० वर्षात राज्य आणि देशात जेवढे रस्ते झाले नाहीत, त्याच्या दुप्पट गतीने आता रस्ते होत आहेत. सन २०१४ मध्ये २८८ राष्ट्रीय महामार्ग झाले. यात ५०० किलो मिटरने वाढ होऊन ७०० किमी कामे झाली असे सांगुन १००० हजार कोटींची सात कामे घोषीत केली. तर उमरी – तळेगाव प्रकल्पासह खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रस्तावित केलेली ५० कोटींचे रस्ते मंजूर केल्याचे जाहीर केले. गावातील पाणी गावात मिळावे, शेतातील पाणी शेतात मिळावे यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. नांदेड – जळकोट ५ तलाव बांधले आहेत. भाविकांचे दैवत असलेलेले श्रीक्षेत्र माहूर रेणुका देवी मंदिर येथे लिफ्ट, स्कायवाय निर्माण करण्यासाठी ७ कोटी दिले असून येत्या पाच महिन्यांत या कामाचे भुमीपूजन होईल, असे सांगत वारंगा रस्त्याच्या कामांकडे लक्ष घालण्यात येईल अशी ग्वाही दिली. तर येत्या काळात नागपूर – रत्नागिरी हा चारपदरी महामार्ग निर्माण करण्यासाठी ३० हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा महामार्ग नांदेड जिल्ह्यामधून जाणार आहे.
यावेळी गडकरी पुढे म्हणाले, वाहतूकीची सुविधा वाढावी यासाठी मुखेड येथे बायपाससाठी पाहणी करण्यात येईल. कंधार – लोहा सिमेंट रस्ता करू, नांदेड – तेलंगणा रस्ता प्रकरणात लक्ष घालू असे सांगत नांदेड-पुणे दोन वर्षात साडेतीन तासात तर पुणे-औरंगाबाद दिड तासात प्रवास करता येईल. यासोबत नागपूर-नांदेड हा प्रवास सुद्धा दोन ते अडीच तासात करता येणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी जवळपास १० हजार कोटींचे कामे पुर्ण होतील, असा विश्वास नांदेडकरांना दिला.