24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमप्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक

प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक

एकमत ऑनलाईन

नांदेड :  शहरात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिम्नॅस्टिक क्लासला आलेल्या एका १५ वर्षीय मुलीला कपडे बदलताना पाहून तिच्याशी जवळीकता साधणा-या क्रीडा प्रशिक्षकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून, त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे.

चंदिगड विद्यापीठातील विद्यार्थिनीचे खासगी व्हीडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा संबंध देशभर झाली. यात जवळपास आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकरण ताजे असतानाच नांदेडमध्येही संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी शाळेजवळ जिम्नॅस्टिक असोसिएशन क्लास, जयपाल रेड्डी (वय ४०) हा क्रीडा प्रशिक्षक चालवितो.

त्याच्याकडे विद्यार्थी, विद्यार्थिनी जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारासाठी प्रशिक्षण घेतात. त्यापैकी शहरातील एक १५ वर्षीय विद्यार्थिनी जिम्नॅस्टिक क्लासला त्याच्याकडे नियमितपणे येत होती. तो दि. २८ डिसेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत सदर विद्यार्थिनीसोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत होता. आपली समाजात बदनामी होईल म्हणून ती मुलगी हा प्रकार सहन करत होती. एके दिवशी तर क्लासच्या चेंजिंग रूममध्ये ती कपडे बदलत असताना पाहून तिचा वारंवार तो विनयभंग करत असल्याने ती त्रस्त झाली.

स्टेट पार्टीसिपेट सर्टिफिकेट व एनओसी मागणी करूनही तो देण्यासाठी टाळाटाळ करत होता. अखेर हा त्रास तिला सहन न झाल्याने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकाराबाबत सांगितले.
त्यानंतर नातेवाईकांनी पीडित युवतीला सोबत घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले

. दि. २० सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी (वय ४०) याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवार (दि. २०) रोजी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाव्हुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि ए. एस. पवार या तपास करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या