देगलूर : प्रतिनिधी
शहरातील अंत्यत वर्दळीचा भाग असलेल्या लालबहादूर शास्त्री नगरात दरोडेखोरांनी एका दाम्प्यांच्या घरात धुमाकुळ घातला़ यात वृद्ध महिलेने दागिणे देण्यास विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली़ या दरोड्यात जवळपास चार लाखाचा ऐवज लुटून नेण्यात आला़ ही घटना सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, देगलूर-उदगीर या मुख्य रस्त्यालगत असलेले लालबहादूर शास्त्री नगर अंत्यत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या नगरात तरंग बार जवळ येडूर तालुका देगलूर येथील मुळ रहिवाशी असलेले पाटील दाम्पंत्य राहते़ सोमवारी रात्री जेवणानंतर वृद्ध पती, पत्नी झोपले होते. रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने घरात प्रवेश केला़ ऐवज लुटीसाठी घरमालक श्रीपतराव रामजी पाटील वय वर्षे ९० वर्षे व त्यांच्या पत्नी चंद्रकला भीमराव पाटील यांचे हात पाय बांधले़ चाकूचा धाक दाखवून चंद्रकलाबाई यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यास विरोध करताच चंद्रकलाबाई यांची हत्या केली़ यानंतर गळ्यातील मनी मंगळसूत्र, सोन्याचे बोरमाळ, हातातील सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे कडे व चांदीचे ७० तोळ्याचे वाळे असे एकूण तीन लाख ८९ हजार रुपयाचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. या प्रकरणी श्रीपतराव रामजी पाटील यांच्या फिर्यादीनूसार देगलूर पोलीस ठाण्यात कलम ३९७,३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सोहन माछरे हे करत आहेत.