उमरी : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि पूर्वी सुरु असलेली नांदेड – निजामाबाद, निजामाबाद – नांदेड सवारी गाडी सुरू करून प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशी मागणी उमरी तालुक्यातील प्रवासी व रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य पारसमल दर्डा यांनी हैदराबाद डिव्हीजनचे रेल्वे मॅनेजर शरद चंद्रयान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याआधी सकाळ व संध्याकाळ यावेळेत चालणारी निजामाबाद -नांदेड व नांदेड-निजामाबाद ही सवारी गाडी कोरोना काळात रेल्वे विभागाने बंद केली. त्यानंतर दोन वर्षांपासून ही गाडी बंदच आहे. कोरोना काळ सरल्यानंतर रेल्वेने इतर गाड्या सुरू केल्या. मात्र, ही गाडी बंदच राहिली.
सकाळच्या वेळेत ये-जा करणा-यांसाठी ही गाडी सोयीस्कर आहे. निजामाबाद, बासर धर्माबाद, उमरी येथून प्रवास करणा-यांची संख्या अधिक असून या वेळेत सकाळी चाकरमान्यांसह शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच दूध, भाजीपाला विक्रेते तसेच विद्यार्थ्यांसाठी ही गाडी सोयीची आहे. मात्र, नांदेड ते निजामाबाद ही सकाळची पॅसेंजर गाडी बंद असल्यामुळे कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णांना, शेतक-यांना त्रास होत आहे. त्यामुळे ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.