22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeनांदेडलिंबोटीचे पाणी लातूरला देण्यास राष्ट्रवादीचा विरोध

लिंबोटीचे पाणी लातूरला देण्यास राष्ट्रवादीचा विरोध

एकमत ऑनलाईन

नांदेड : कंधार, लोहा या दोन तालुक्यातील शेती, सिंचनासाठी अप्पर मानार धरण (लिंबोटी धरण) याची निर्मिती करण्यात आली. परंतु हे पाणी लातूरला पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे कंधार, लोहा तालुक्यातील शेतक‍-यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे लिंबोटी धरणाचे पाणी लातूरला देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदन केली आहे.

लिंबोटी धरणाची निर्मिती कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी करण्यात आली. शेतीला मुबलक पाणी देता आले नाही, परंतु युती शासनाच्या काळात १९९५-२००० जवळपास ३५ टक्के पाणी इतरत्र वळवले. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरला पाणी देण्यात आले. त्यानंतर पुन्हा भाजपच्या फडणवीस सरकारने पुन्हा पालम आणि उदगीर शहराला पाणी देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता देवधन तलावातील पाणी उदगीरसाठी उपलब्ध असताना लिंबोटी धरणातील पाणी उपलब्ध करून घेतले. पालम शहराला डिग्रस बंधा‍-यातून पाणी घेणे जवळचे असताना देखील लिंबोटीतून पाणी उपलब्ध करून घेतले. त्यामुळे लोहा-कंधार या तालुक्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र घटले आहे.

परत एकदा कंधार, लोहा या तालुक्यातील शेतकर्‍यांचे पाणी पळविण्याचा घाट सुरू असून लातूरसाठी पाणी पळविले जात आहे. वास्तविक पाहता लातूर शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उजनीतून पाणी आणण्याचा प्रस्ताव आहे. असे असताना लिंबोटी धरणातून पाणी घेणे उचित नाही. लिंबोटी धरणाचे पाणी लातूर जिल्ह्याला देऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

दरम्यान यापुर्वीच लातूर आणि परभणी जिल्ह्यातील तालुक्यांना या धरणातून पाणी दिले जाते. आता परत एकदा लातूरला पाणी नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कंधार,लोहा तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय होत आहे.,असे पुन्हा होऊ नये अशी मागणी हरिहरराव भोसीकर यांनी केली आहे.

सकारात्मक चर्चा
लिंबोटी धरणातील पाणी यापुर्वीच इतर ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पाणी लातूरला देण्यात येऊ नये या विषयावर मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लातूरला लिंबोटीचे पाणी देणार नाही यासंदर्भात सकारात्मक आश्‍वासन दिले.

शिवधनुष्य पेलताना…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या