उमरी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली निजामाबाद ते नांदेड आणि नांदेड ते निजामाबाद सवारी ( रेल्वे गाडी क्रमांक ५७५५७ , ५७५५८ ) आता जुलैमध्ये सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य पारसमल दर्डा यांनी दिली आहे.
कोरोना काळात दक्षिण मध्ये रेल्वे विभागातील सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु कालांतराने हळूहळू सर्व गाड्या पूर्ववत झाल्या आहेत . परंतु निजामाबाद नांदेडकडे जाणारी आणि नांदेडकडून निजामाबादकडे येणारी सवारी रेल्वे रेल्वे विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे सुरू झाली नाही. रेल्वे गाडी सुरू करावी , अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. दरम्यान सिकंदराबाद येथे झालेल्या रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत रेल्वे पभोक्तासल्लागार समितीचे सदस्य पारसमल दर्डा यांनी लेखी मागणी केली.
तसेच रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा केला . त्याची दखल घेऊन रेल्वे विभागाच्या वतीने एक परिपत्रक काढले आहे . त्यात दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अनेक रेल्वे गाड्या नव्याने सुरू करण्यात येत आहेत . त्याच परिपत्रकात निजामाबाद ते नांदेड आणि नांदेड ते निजामाबाद सवारी गाडीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीला आता पूर्णविराम मिळणार असून जुलैमध्ये ही सवारी रेल्वे गाडी सुरू होणार आहे अशी माहिती पारसमल दर्डा यांनी दिली आहे. तसेच नगरसोल – नरसापूर आणि नरसापूर ते नगरसोल या एक्सप्रेसला उमरी आणि धर्माबाद येथे थांबा देण्यात यावा तसेच तिरुपतीहून निजामाबादपर्यंत येणारी रॉयल सीमा एक्सप्रेस नांदेडपर्यंत विस्तारीत करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.