तामसा : तामसा शहराच्या दोन किमी अंतरावर असलेल्या पाथरड येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एक घर फोडले तसेच पाथरड शिवाराच्या शेतातील आखाड्यावरील सालगड्याला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी ता.२२ मध्यरात्री घडली आहे.
अज्ञात चोरट्यांनी माधव शिरगिरे यांच्या शेतातील आखाड्यात झोपलेले सालगडी कोंडबा खापरे यांना दगडाने मारहाण करून डोके रक्तबंबाळ केले. तसेच त्यांच्या आईच्या गळ्यातील पोत बळजबरीने हिसकावून घेत त्यांनाही मारहाण केली. चोरट्यांनी गावातील मारुती पवार यांचे घर फोडून घरातील सुटकेमधील कपडे व सामानाची फेकाफेक केली. चोरीनंतर गावात खळबळ उडून रात्रभर ग्रामस्थांनी अज्ञात चोरट्याचा शोध घेतला. अज्ञात चोरटे सात ते दहाच्या संख्येने असावेत. चोरी व मारहाणीची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर फौजदार बालाजी किरवले यांनी मध्यरात्रीच पाथरड येथे जाऊन पाहणी केली. चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेले सालगडी यांच्यावर तामसा प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करण्यात आले. जखमी कोंडबा यांना डोक्याला तीन टाके बसले असून हाताला दगडाचा जबर मार आहे.या दोन्ही घटनेमुळे पाथरड व परिसरात खळबळ उडवून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत सोमवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.