नांदेड : रस्त्याच्या कडेला साचलेल्या चिखलामुळे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होवून एका २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्रीला तरोडा भागात मालेगाव रोडवर घडली. मयत तरूणाचे नाव स्वप्नील प्रेमानंद ढवळे असून अन्य दोघेजण या अपघातात जखमी आहेत.
गुुरूवारी रात्री स्वप्नील प्रेमानंद ढवळे (२२) हा मालेगाव रोडने जात असताना त्याच्या दुचाकीस समोरून येणा-या अन्य एका दुचाकीने जोराची धडक दिली. अपघात झालेल्या परिसरात रस्त्यालगत नाला आहे, या नाल्याचे पाणी आणि गुरूवारी पडलेले पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने येथे चिखलमय वातावरण निर्माण आहे. परिणामी वाहनांची ये-जा होताना घसरगुंडी होत असून, सदर ठिकाणी स्वप्नीलच्या व अन्य दुस-या एका दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात स्वप्नील ढवळे या याचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात भाग्यनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, अद्याप या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.