नांदेड : अतिवृष्टीने किनवट, माहूर व अर्धापूर तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले़ विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शनिवारी येथील काही गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली़ तर दत्तमांजरी येथील शेतक-यांशी संवाद साधून पवार यांनी माहिती घेतली़यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.
राजकीय घडामोडीनंतर राज्यातील आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले़ यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार स्थापन झाले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतांनाच राज्यात मागील पंधरा दिवसात मुसळधार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टी झाली़ यामुळे राजकीय पुढारी सर्वच दौरे करित आहेत. नांदेड जिल्ह्याला ही अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यात हिमायननगर, किनवट, माहूर, अर्धापूर या तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण झाली होती़
यामुळे हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली़ तर अन्य तालुक्यात सुद्धा पिकांचे नुकसान झाले आहे. केवळ पंधरा दिवसात दोन वेळा झालेल्या या अतिवृष्टीले खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे राज्यातील काही जिल्ह्यात पाहणी दौरा करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी शनिवारी सकाळी किनवट, माहूर मतदार संघातील दत्तमांजरी, कुपटी, वझरा, मांडवा या गावात भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी पवार यांनी दत्तमांजरी येथील शेतक-यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली.
यावेळी माजी आमदार प्रदिप नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी उपाध्याक्ष गब्बा राठोड, समाधान जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ यानंतर दुपारी अर्धापूर तालुक्यातील पार्डी, मेंढला धामदरी, मालेगांव आदी भागातील पूरग्रस्त शेतक-यांची पिक पाहणी केली. या दौ-यात तालुक्यातील शेतक-यांनी अजित पवारांकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले. खरिप हंगामातील सोयाबीन ज्वारी, कापूस, मुग, उडीद इत्यादी पिकांना सरसकट हेक्टरी ५० हजार व बागायती, फळबाग पिकासाठी हेक्टरी एक लाख रुपये तातडीची मदत मिळवून द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हाचिटणीस अँड. सचिन देशमुख यांनी आहे.