18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडविजेचा लंपडाव; व्यापा-यासह नागरिक त्रस्त

विजेचा लंपडाव; व्यापा-यासह नागरिक त्रस्त

एकमत ऑनलाईन

नांदेड: ऐन सणासुदीच्या काळात विजेचा लंपडाव सुरू आहे.यामुळे दिवसभरातील कामाचा खोळंबा होत असून या त्रासामुळे व्यापा-यासह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.यात कोळसा टंचाईची भर पडल्याने भारनियमनाचे संकट गडद झाले आहे.दरम्यान संकट काळात ग्राहकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून नांदेड शहरासह ग्रामीण भागात विजेचा लंपडाव सुरू झाला आहे. महिन्याभराच्या काळात जिल्हयात दोन वेळा अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झाला आहे.या काळात अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत झाला तो संकट काळात नागरिकांनी सहन केला.मात्र पुन्हा सतत विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.ऐन सणा सुदीच्या काळात सकाळ,संध्याकाळ अचानक दोन ते तीन तास वीज गायब होत आहे.यामुळे दिवसभरातील कामकाज ठप्प होत आहे.तर बाजारपेठही ठप्प होत आहे.यामुळे व्यापा-यांसह नागरिक महावितरणच्या कारभाराने त्रस्त झाले आहेत.

विजेच्या या लंपडावात आता कोळसा टंचाईची भर पडली आहे.सध्या देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणा-या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणा-या विजेमध्ये घट होत आहे.

विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे,असे महावितरणकडून सांगण्यात आले.मात्र कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणा-या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या