नांदेड : जिल्ह्यात मागच्या आठवडाभरापासून बदलत्या हवामानाचे चित्र पाहावयास मिळत असून, कधी सोसाट्याचा वारा, ढगाळ वातारण तर कधी तुरळक ठिकाणी पाऊस यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. दरम्यान गुरूवार दि. १९ मेरोजी रोजी सकाळी जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर वातावरणात उष्णता वाढून नागरिक घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. दरम्यान गुरूवारी सकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वादळीवा-यासह पावसाने हजेरी लावली. या पुर्वीच हवामान विभागाने मराठवाड्यातील काही जिल्ह््यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. अचानक आलेल्या आवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी सकाळपासूनच शेतात कामासाठी जात आहेत. मात्र गुरूवारी सकाळी अचानक आकाशात ढग येवून मान्सूनपुर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यासह कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तर सकाळी झालेल्या पावसामुळे दिवसभर उष्ण आणि दमट वातारण निर्माण होवून नागरिक घामाघुम झाले तर रात्रीच्या उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.