भोकर : जीवनातल्या कठीण काळातही माणुसकीची जोपासना करणे हीच खरी भारतीय संस्कृती असून कोरोना महामारी च्या महाभयंकर काळातही आपण आपले कर्तव्य पार पाडून माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले असे गौरवोद्गार भोकर न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मा. मुजिब शेख यांनी काढले ते तालुका विधी सेवा समिती सप्ताहाच्या व नगरपालिका भोकर यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती पांडे, न्यायमूर्ती तळेकर मॅडम, तहसीलदार भरत सूर्यवंशी, मुख्याधिकारी सौ.प्रियंका टोंगे आदींची उपस्थिती होती.
ते पुढे बोलताना म्हणाले की कोरोना महामारीने अख्खा जगात थैमान घातले होते. त्यामुळे सर्व जग जागच्या जागी थांबून सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरच्या राज्यातून अनेक गोरगरीब, कष्टकरी, मजुरदार शहरात व ग्रामीण भागात ठिकाणी अडकून पडले होते. या बिकट परिस्थितीत आपले कुटुंब व आपला संसार आता कायमचा संपणार की काय? अशी भीती या लोकात निर्माण झाली होती. भोकर शहरात रस्त्याच्या कडेला मजूरदार, कष्टकरी, गोरगरीब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आजूबाजूला पाली टाकून राहत होते. त्यांना काय खावे, आणि कसे जगावे हा भीषण प्रश्न पडला होता.
पण अशा बिकट काळातही शहरातील विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मंडळी यांनी ह्या निराधार कुटुंबांना सातत्याने दीड ते दोन महिने नियमितपणे भोजन दान करून आधार दिला आणि माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.
या त्यांच्या समाजकायार्ची दखल घेऊन विधी सेवा समिती भोकर व नगर परिषद भोकर यांच्या संयुक्त विद्यमानाने या सर्व कोरोना योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या उद्देशाने एक छोटेखानी आम्ही सत्काराचा कार्यक्रम ठेवून आपणास प्रमाणपत्राचे वाटप करत आहोत. तसेच भविष्यातही कोरोनाच्या विरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला मिळावी हा उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागे आहे असे सांगितले.
कोरोना महामारीसी दोन हात करता करता अनेक अधिका-्यांना, आरोग्य कर्मचा-्यांना, पत्रकार बांधवांना, बँकेतील कर्मचा-यांना, महसूल कर्मचा-्यांना व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाही झाला होता. पण आपल्या आत्मशक्तीच्या बळावर त्यांनी सर्वांच्या सहकायार्ने विजय मिळवून पुन्हा जनसेवेचे व्रत अव्याहतपणे चालू ठेवले. अशा सर्व भोकर शहरातील मान्यवरांचा सत्कार व प्रमाणपत्र देऊन येथोउचित गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने तहसीलदार भरत सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे, डॉ. यु.एल. जाधव, माने सर, विधी तज्ञ कुलकर्णी, लामकानीकर, सेवा समर्पण परिवाराचे पदाधिकारी, सावली प्रतिष्ठानचे पदाधिकारी, एक हात मदतीचा प्रतिष्ठान, पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यासह अनेक सेवाभावी संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.